नारायण राणेंनी सोडला काँग्रेसचा ‘हात’
सिंधुदुर्ग : कुडाळमधील पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी १२ वर्षात काँग्रेसमध्ये झालेली ससेहोलपट, खदखद व्यक्त करत काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन देऊनही ते पाळले नाही. माझी तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो, अशा शब्दात नारायण राणे यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडला आहे. त्याचबरोबर विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा राणेंनी दिला.
सोनिया गांधींना दोन वाजता पत्र पाठवले आणि त्यानंतर सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला, असे सांगत नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. मुख्यमंत्रीपदाची आश्वासने काँग्रेसने दिली पण पाळली कधीच नाही. मी २६ जुलै २००५ रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण या १२ वर्षात माझ्या कामाचा, अनुभवाचा फायदा करुन घेतला नाही, असे म्हणत राणेंनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस समोरुन आम्ही राणेंना घाबरतो, असे दाखवत असे. पण दिल्लीत मला वेळ मिळायची नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
मुख्यमंत्री करतो तीन वेळा म्हणाले, वर्ष गेले नवा पण पद मिळाले नाही. नारायण राणेंना मुख्यमंत्री करा असे ४८ आमदारांनी सांगूनही माझे नाव घोषित केले नाही. प्रणव मुखर्जी, दिग्विजय सिंह विमानातून दिल्लीला घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाण यांचे नाव जाहीर केल्याचे राणे यांनी सांगितले. मुख्यमंत्री झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदा मला भेटले. तुम्हाला हवे ते मंत्रीपद मागा, असे सांगत, त्यांनी माझे महसूल मंत्रीपद काढून उद्योगमंत्री बनवले, अशी नाराजी नारायण राणेंनी व्यक्त केली.
मी आमदारकी मागितली नव्हती. मला राहुल गांधी यांनी आमदार केले. अशोक चव्हाण मला आमदार करु नये यासाठी दिल्लीत बसून होते, असा आरोप नारायण राणेंनी यावेळी केला. मला विधानपरिषदेत विरोधी पक्षनेत्याच्या बाजूला बसायला दिले पाहिजे होते. मी वरिष्ठ नेता असूनही मला गटनेता केला नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. आज पक्ष सोडला असून नवरात्र संपण्याच्या पुढचा निर्णय आत घेऊ. अनेक पक्षाच्या ऑफर माझ्याकडे आहेत. योग्य ठिकाणी योग्य वेळी निर्णय घेऊ. आता महाराष्ट्र दौरा करणार असून नागपूर, औरंगाबाद, नांदेडला जाणार आहे, असे नारायण राणेंनी सांगितले.
त्याचबरोबर काँग्रेस सदस्यत्वाचा निलेश राणेंनीही राजीनामा दिला आहे. योग्य वेळ येईल तेव्हा नितेश राणेंबाबत निर्णय घेऊ. पण नितेश राणेंच काय काँग्रेस आणि शिवसेनेमधील अनेक आमदार राजीनामा देतील, असे नारायण म्हणाले.

0 Comments