प्रतिनिधी / सातारा
शिक्षक बँकेत गोंधळाची परंपरा यंदाही कायम राहिली. तरीही विरोधकांना चोख उत्तर देत चेअरमन बलवंत पाटलांनी सभा यशस्वीपणे पार पाडली. सभा सुरु होण्यापूर्वीच समितीच्या शिक्षक कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पाटील गटाच्या संचालकांकडून काळ्या फिती लावून निषेध करत केलेला सभात्याग अन् गोंधळातच झालेली धक्काबुक्की त्यामुळे तणाव असूनही सभेचे कामकाज पार पाडून चेअरमन बलवंत पाटलांनी मैदान मारले.
समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सभेपूर्वीच गोंधळाला सुरुवात केली. ‘व्याजदर कमी करा, म्हसवड शाखेच्या फर्निचरमध्ये किती डल्ला मारला, चेअरमन काय जादूगार’ अशा आशयाचे फलक घेऊन त्यांची घोषणाबाजी सुरु होती. तर समोरून बलवंत पाटील समर्थक त्यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. त्यानंतर मध्येच धक्काबुक्की सुरु झाली. समितीच्या कार्यकर्त्यांना बलवंत पाटील यांनी विनंती केली. तरीही समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरुच ठेवली. धक्काबुक्की होतच होती. पाटील यांनी जोपर्यंत तुम्ही शांत बसत नाही, तोपर्यंत सभा संपणार नाही. तुम्ही गेल्या पाच वर्षात काय दिवा लावला हे सभासदांना माहिती आहे. धंदा कमी अन् फायदा जास्त असा खालून आवाज येताच, पाटील यांनी पुन्हा अक्कल आहे आम्हाला, बँक चालवायची, म्हणून बँक फायद्यात आहे. बँकच्या नियमातील कळत असते तर न्यायालयात निकाल उलटा गेला नसता, ज्यांची बुद्धी साधारण आहे त्यांना काय बँकींग कळणार, असे पाटील यांनी सुनावले.
समितीच्या काही मंडळींनी माईकची मागणी केली. तरीही पाटील यांनी तुम्ही खाली बसलात तर तुम्हाला माईक दिला जाईल, असे सांगितले. काही कार्यकर्त्यांनी पत्रके फेकली. तब्बल दीड तास गोंधळ घातल्यानंतर समितीचे सर्व सभासद बाहेर पडले अन् पाटील यांचा जयघोष होत पुन्हा सभा सुरु झाली. त्यामध्ये सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना पाटील यांनी उत्तरे दिली.
व्यासपीठावर घुसखोरी
माजी चेअरमन विठ्ठल माने यांना बोलण्यास विनंती करुनही तेे आले नाहीत तर किरण यादव, सुभाष शेजवळ यांनी व्यासपीठावर घुसखोरी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तेथेच वेडेवाकडेपणाने नाचत एक संचालक थेट चेअरमन पाटील यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला.किरण यादव यांनी डायसचा ताबा घेतल्यानंतर पाटील यांनी पोलिसांनी यादव यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.
शिवाजीराव पाटील गटाचे संचालक संचालक तुकाराम कदम, ज्ञानेश्वर कांबळे, महेंद्र अवघडे, सौ. निर्मला बसागरे, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र ढमाळ, सरचिटणीस प्रदीप घाडगे, विजय थोरात, सुगंधराव जगदाळे व सदस्य काळ्या फिती लावून सभेला गेले होते. सभा सुरु होताच त्यांनी सभात्याग करुन बाहेर चेअरमन बलवंत पाटील यांच्या एकाधिकार शाहीचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, बलवंत पाटील यांनी सभासद नसलेले भाडोत्री लोक सभेत आणले होते. संचालकांनी पूर्वनियोजीत प्रश्न विचारले होते. या सभेचे रेकाडींग मिळावे अशी मागणी पत्रकाद्वारे केली.


0 Comments