सातारा
एका खासगी क्लासचालक शिक्षकाला त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत खंडणी उकळणार्या दोन अल्पवयीन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. सुमारे दीड लाखांची रक्कम घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
याबाबतची माहिती अशी, शहरातील एका अज्ञाताने शहर पोलिसांकडे एक तक्रार अर्ज दाखल केला होता. सदरचा इसम एका खासगी क्लासवर शिक्षक आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही फोटो या अल्पवयीन युवकांच्या हाती लागले होते. हे फोटो इंटरनेटवर टाकू, चौकात फ्लेक्स करुन लावू अशी धमकी देत त्याच्याकडे या दोघांनी 1 लाख 40 हजार रुपयांची मागणी केली. दि. 24 रोजी पैसे मागितल्याची तक्रार मिळताच पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला. आरोपी कॉईन बॉक्सवरुन फोन करत होते. त्यानंतर तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर फिर्यादीला खंडणीखोरांनी खंडणीची रक्कम घेवून डी मार्ट परिसरात बोलाविल्याचा फोन आला. त्यानंतर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला. खंडणी स्वीकारण्यासाठी दुचाकीवरुन आलेल्या दोन अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी रंगेहात पैसे स्वीकारताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकरता व गाडीचे हप्ते भरण्याकरता, मोबाईल घेण्याकरता व पैशाच्या मोहासाठी हा गुन्हा केल्याचे त्यांनी पोलिसांसमोर कबुल केले.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जराड, सहाय्यक फौजदार सुरेंद्र पानसांडे, संजय पवार, मोहन घोरपडे, बाळासाहेब शिर्के, उत्तम दबडे, तानाजी माने, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, अर्जुन शिरतोडे, विक्रम पिसाळ यांनी कारवाई केली. त्यांचे अभिनंदन पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी केले.

0 Comments