लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा सत्कार करताना पद्मश्री माने, मान्यवर आणि माजी विद्यार्थी.
सातारा
अथक जिद्दीच्या बळावर शहीद कर्नल महाडीक यांच्या पत्नी स्वाती महाडीक सैन्य दलात भरती झाल्या. तदनंतर शनिवारी ता. २३ रोजी पद्मश्री लक्ष्मान माने यांच्या हस्ते त्यांचा भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेचे यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी कॉलेजमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ. शालिनी जोसेफ, भाई माने उपस्थित होते. यावेळी आयोजित संवादात लेफ्टनंट स्वाती महाडिक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
यावेळी महाडीक म्हणाल्या, समाजकार्य महाविद्यालयाने मला 'असे का?' असा व्यवस्थेला उलट प्रश्न विचारायला शिकविले. नवीन रस्ता शोधणं, नव्या वाटा निवडणं हे देखील मी या महाविद्यालयाकडूनच शिकले. नुसता प्रश्न उपस्थित करून न थांबता आलेल्या निर्णयावर स्वतःचे मत ही ठरले पाहिजे. त्यामुळे जीवनातील चढ-उतारात खचून न जाता उभा राहिले पाहिजे, सोबतच व्यक्तही झाले पाहिजे. गेल्या सोळा वर्षांपासून कॉलेजच्या माझ्या बॅचमधील सर्व सहकारी एकमेकांची काळजी घेताना सुख-दुःखामध्ये सामील होतात, हे अविस्मरणीय वास्तव असल्याचे मत त्यांनी मांडले. पती संतोष यांच्याकडून घेतलेली प्रेरणा यासह त्यांच्यासोबत घालवलेला वेळ, तसेच एकत्र पाहिलेला पहिला सिनेमा 'साथिया' आणि त्यावेळचे त्यांचे अनुभव, रेल्वेमध्ये त्यांचे विसरलेले सामान आणि संतोष यांनी त्यासाठी केलेली धावपळ असे काही भावनिक अनुभव त्यांनी आवर्जून सांगितले. सत्कार केल्यानंतर पद्मश्री लक्ष्मण माने यांनी कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्वाती कडून प्रेरणा घ्यावी. प्रत्येक मुलीने तिच्या क्षेत्रामध्ये शंभर टक्के योगदान देऊन स्वातीसारखे उच्च स्थान गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो. स्वातीने तिच्या आयुष्यात अजून प्रगती करत राहावी, अशी आशा आपल्या मनोगतात व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समता माने तर आभार माजी विद्यार्थी राहुल कांबळे यांनी मांडले. यावेळी लेफ्टनंट स्वाती यांचे वर्गमित्र व मैत्रिणी तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

0 Comments