सातारा
672 कोटींचे कर्ज आणि 87 कोटींचा तोटा घेऊन किसन वीर साखर कारखाना कसा मार्ग काढणार आहे. उच्चांकी कर्ज-देणी, उच्चांकी तोटा आणि निच्चांकी दर व गळीत या गर्तेत अडकविण्याचे काम विद्यमान अध्यक्ष मदन भोसले यांनी केले आहे. त्यांच्या या कारभाराची शासनाने चौकशी करून कर्जाची व तोट्याची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करावी, अशी मागणी कारखान्याचे सभासद बाबासाहेब कदम, राजेंद्र शेलार, बाबुराव शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली आहे.
श्री. कदम, श्री. शिंदे व श्री. शेलार म्हणाले, किसन वीर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (ता. 27) होत आहे. यामध्ये अध्यक्षांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. कारखान्यावरील आजच्या आर्थिक आरिष्टाला विद्यमान अध्यक्षांचा मनमानी कारभार जबाबदार आहे. सहकार चळवळीच्या इतिहासात एखाद्या कारखान्याला एकाच वर्षात 68 कोटी रूपये तोटा होण्याचा मान मदन भोसले यांनी किसन वीर कारखान्याला मिळवून दिला आहे. गेल्या तीन वर्षात साखरेला समाधानकारक दर असतानाही किसन वीर ला साखर व उपपदार्थ विक्रीतून अपेक्षित उत्पन्न व नफा मिळत नाही.
त्यांनीच निर्माण केलेल्या गुंत्यातून बाहेर पडताना त्यांनी नवे गुंते निर्माण केले आहेत. प्रतापगड आणि खंडाळा कारखान्याची उभारणी करताना किसन वीर च्या सभासदांना तोशिस लागणार नाही, याची काळजी घेतलेली नाही. अहवालात 306 कोटी पेक्षा जास्तीचे कर्ज असून एकुण देणी 308 कोटींची तर थकित व्याज 17 कोटी 30 लाख रूपये आहे. कारखान्याने भागभांडवलात बेकायदा वर्ग केलेल्या 42 कोटी रूपयांच्या ठेवी परत देण्याचा उच्च न्यायालय आणि साखर आयुक्तांचा आदेश विचारात घेता कर्ज आणि देणी याचीं एकुण रक्कम 672 कोटींवर जात आहे. आता कर्ज, देणी आणि व्याजाचा बोजाने ही मातृत संस्था कशी चालणार असा प्रश्न सभासदांना पडला आहे. गेल्या हंगामात कारखान्याने ऊसाला 2700 रूपये दर जाहीर केला. तो इतर कारखान्यांचय तुलनेत 300 ते 600 रूपयांनी कमी आहे. हा कमी दरही अद्याप पूर्ण मिळालेला नाही. सभेपूर्वी तो जाहीर केला तरी तो देण्यास उशीर केला आहे. किसन वीर च्या सभासदांइतके संयमी सभासद अन्य कुठेच नाहीत. सभासदांच्या संयमाचा अंत अध्यक्षांनी नेहमीच पाहिला आहे. संस्था इतकी तोट्यात असूनही ऑडीट वर्ग ब मिळाला आहे. कामगारांना तीन ते चार महिने पगार मिळत नाही, ऊस बीले मिळण्यात तीन तीन महिन्यांचा विलंब लागत आहे. अशा परिस्थितीत कारखाना कसा चालणार याचे स्पष्टीकरण अध्यक्ष मदन भोसले यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

0 Comments