नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम सध्या तुरूंगात आहे. पण, आता त्याने केलेले कारनामे चित्रपटाच्या माध्यमातून भव्य पडद्यावर येणार आहेत. या चित्रपटात राम रहीमची भूमिका साकारणार याबाबत उत्सुकता आहे. पण राखी सावंत हनीप्रीतच्या भूमिकेत दिसणार अशी जोरदार चर्चा आहे.
बाबा राम रहीम तुरूंगात २० वर्षांची शिक्षा भोगत आहे आणि त्याची मानलेली मुलगी हनीप्रीत सध्या फरार असून पोलीस तिचा तपास घेत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नेपाळच्या इटहरीमधील परिसरात हनीप्रीत दिसली होती. दरम्यान, सांगितले जात आहे की, चित्रपटाच्या माध्यमातून राम रहीमचे गुन्हेगारी विश्व आणि त्याचे कारनामे पुढे आणले जाणार आहे. यात बाबा राम रहीमचा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख ते रॉकस्टार आणि पुढे तुरूंगवास असा प्रवास दाखवला जाणार आहे. तसेच, हनीप्रीतचे त्याच्यासोबत असलेले नातेसंबंधही या चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आणले जातील.
या चित्रपटाचे राजधानी दिल्ली येथे शुटींगही सुरू झाले असून, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात एजाज खान तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर, आशुतोष मिश्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील.

0 Comments