Hot Posts

6/recent/ticker-posts

दाऊदला पोलीस ओढणार जाळ्यात?



मुंबई: खंडणीच्या गुन्ह्यात मुंबईलगतच्या ठाणे पोलिसांनी कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा भाऊ इकबाल कासकर याच्या मुसक्या आवळल्यानंतर या गुन्ह्यात दाऊदचा प्रत्यक्ष सहभाग आहे का; याचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या धडक कारवाईनंतर प्रत्यक्ष दाऊदला जाळ्यात ओढण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आठवड्यापूर्वीच केंद्रीय मंत्री जनरल (निवृत्त) व्ही के सिंग यांना पत्रकारांनी दाऊदला भारतात आणण्याबाबत सवाल केला होता. त्यावर बोलताना सिंग यांनी; याबाबत आम्ही काही बोलणार नाही. प्रत्यक्ष कृतीतून ते दिसेल; अशी ग्वाही दिली होती. मांजराला आम्ही गोणपाटाच्या बाहेर पडू देणार नाही; असेही ते म्हणाले होते. त्यानंतरच वेगवान हालचाली सुरू होऊन इकबाल कासकाराला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याची जेरबंदी हा दाऊदला जाळ्यात ओढण्याच्या डावपेचाचा भाग आहे काय; याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
एका बांधकाम व्यावसायिकाकडे वारंवार रोख रक्कम आणि सदनिकांच्या स्वरूपात इकबालकडून खंडणी मागितली जात असल्याबद्दल तक्रार आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. निलंबन मागे घेतल्यानंतर सेवेत पुन्हा रुजू होताच धडाडीचे ‘एनकाऊंटर फेम’ पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी ही कामगिरी केली. या बिल्डरला खंडणीसाठी धमकी देताना दाऊदचे नाव वापरण्यात आले. त्यात त्याच्या टोळीचाच सहभाग होता आणि विविध राज्यातून त्यासाठी ‘शार्प शूटर’ आणण्यात आले आहेत; अशी आमची माहिती आहे. आता या प्रकरणात स्वतः दाऊदचा सहभाग आहे काय; याची माहिती आम्ही घेत आहोत; असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments