पुणे प्रतिनिधी-- जेष्टय साहित्यिक , पत्रकार, कादंबरीकार व कथा लेखक ह. मो. मराठे (वय 77) यांचे आज पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने आज पहाटे पावणेदोन वाजता निधन झाले.
ह.मो. मराठे यांचा जन्म 2 मार्च 1940 रोजी झाला. तथापि आपली नेमकी जन्मतारीख काय आहे हे हमोंनाही माहीत नव्हते. हमोंना त्यांच्या भावाने वयाच्या १० - १२ व्या वर्षी शाळेत घातले शिकून ते एम.ए. झाले आणि कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापकी करू लागले. पण पुढे लेखन, वाचन, संपादन आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ते स्थिरावले. त्यांचे पहिले साहित्य म्हणजे १९५६ साली साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली एक नाटिका. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती साधना साप्ताहिकाच्या १९६९ साली प्रसिद्ध झालेल्या ’निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीने. ही कादंबरी पुढे १९७२ साली पुस्तकरूपात आली. ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे.
ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली.

0 Comments