Hot Posts

6/recent/ticker-posts

थापाड्या रावणाचे ‘मनसे’तर्फे सातार्‍यात दहन


सातारा दि. 2; विविध अपप्रकारांचा प्रतिकात्मक निषेध आणि परंपरांचे जतन करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांच्या हस्ते विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सातार्‍यात थापाड्या रावणाचे दहन करण्यात आले. पिरवाडी (गोरखपूर) येथील मनसेच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते, पदाधिकारी, मनसैनिक आणि बालगोपाळांच्या उपस्थितीत तसेच राम, लक्ष्मण, सीता व हनुमंत यांच्या वेशभूषा केलेल्या बालसैनिकांच्या अपार उत्साहासह रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
      याबाबत मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या राज्यात आणि देशात विविध समस्यांमुळे सर्वसामान्यांचे जगणे हैराण झाले आहे. महागाईचा राक्षस घराघरातील गृहिणींची दशा करुन सोडत आहे. कुटूंबप्रमुखाच्या चिंतांमध्ये वाढच होत आहे. अशातच गेल्या वर्षी झालेल्या नोटबंदीमुळे व्यापारी, उद्योजकांचीही मोठी हालत झाली आहे. तर सर्वसामान्य व मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणार्‍या सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे तर खूपच हाल होत आहेत. रोजगार मिळत नसल्याने त्यांना दोनवेळचे जेवण मिळणेही मुश्किल झाले आहे. त्यातच ‘जी. एस. टी.’ सारख्या जाचक करप्रणालीच्या निर्णयाने संपूर्ण बाजारपेठच कोलमडून गेली आहे. चलन फिरत नसल्याने व्यापारी आणि ग्राहक तसेच गरजू सर्वसामान्य मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत. बाजारपेठेतील प्रचंड मंदीच्या वातावरणामुळे सण-उत्सव साजरे करणेही अवघड झाले आहे. शासकीय पातळीवरील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या भ्रष्टाचारामुळे त्यात भरच पडत आहे. लाच दिल्याशिवाय कुठल्याही शासकीय कार्यालयातील कोणतेही कामकाज होत नाही. नोकरशाहांच्या मनमानीमुळे सरकारी कार्यालयातील कामकाज प्रलंबीत राहत आहे. परप्रांतियांच्या लोंढ्यांमुळे स्थानिक नागरीकांच्या सोईसुविधांवर परिणाम होत आहे. ठोस कोणतीही रोजगार उपलब्ध करुन देणारी शासकीय यंत्रणा सक्रीय नसल्याने बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत आहे. विद्यालये, महाविद्यालये व विद्यापिठे केवळ कागदी पदवीधर निर्माण करणारे कारखाने ठरत आहेत. कारखानदारीबाबत शासनाचे शासकीय धरसोड औद्योगिकरणाला मारक ठरत आहे. त्यामुळे कारखानदार आणि तेथील कामगारांची अवस्थाही फारशी आशादायक नाही. बुलेट ट्रेनसारख्या हवेतील बुडबुड्यांसाठी करोडो रुपयांची नासाडी करण्याचे शासन ठरवत असून सर्वसामान्यांची वाहतूक यंत्रणा असणार्‍या बस, रेल्वे यांच्या सोयी-सुविधांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी देतो, असे सांगून फसव्या मोहजालात अडकवले जात आहे. मायक्रोफायनान्ससारख्या कंपन्यांच्या विळख्यात सर्वसामान्य घरातील माताभगिनी फसत असून संबंधित कंपन्यांच्या अनागोंदी मनमानी आणि दहशतीमुळे आत्महत्येसारख्या प्रकाराकडे वळत आहेत. अवैध दारु, मटका, क्लब आदींमुळे सर्वसामान्यांच्या घरातील अर्थकारण कोलमडले आहे. गरीबांच्या घरात दोनवेळच्या चुली पेटणेही मुश्किल झाले आहे. या व इतर अनेक अवैध घटना घडामोडींमुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन पिळवटून गेले आहे. या चक्रव्यूहातून त्यांना बाहेर काढण्याऐवजी गोंडस नावे दिलेल्या योजनांचा भूलभुलैय्या दाखवून त्यांची दिशाभूल होत आहे. अभ्यास दौर्‍यांच्या नावाखाली परदेश वार्‍या करुन पंतप्रधान व त्यांचे सहकारी जनतेस फसवत आहेत. थापा मारणार्‍या या प्रवृत्तींचा निषेध म्हणून दसर्‍याच्या मुहूर्तावर या सर्व अनिष्ठ प्रथांचा प्रतिकात्मक रावण मनसेच्या माध्यमातून दहन केल्याचेही संदीपदादा मोझर यांनी या पत्रकात म्हटले आहे.
     यावेळी संदीपदादा मोझर यांच्या हस्ते मशालीद्वारे थापाड्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. कार्यक्रमास खेडच्या उपसरपंच सुशिलाताई मोझर, मनसेचे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जाधव, जिल्हा सचिव सागर पवार, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे वाई तालुकाध्यक्ष सुभाषराव चौधरी, मनसेचे वाई तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पिसाळ, पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर, कोरेगाव तालुकाध्यक्ष सागर बर्गे,  विजयबापू पंडित, पाटण शहराध्यक्ष चंद्रकांत बामणे, संदीप जाधव, नितीन सुतार, प्रगतीशील शेतकरी कमलाकर वाघ, विलास शिंदे, मनसे महिला आघाडीच्या सातारा तालुकाध्यक्षा अनिताताई जाधव, सौ. रेश्माताई मोझर, अनिताताई चव्हाण आदी पदाधिकारी, मनसैनिक व बालगोपाळ तसेच शहर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाल कलाकारांमुळे अनोखा उत्साह
 प्रारंभी राम, लक्ष्मण, सीता व हनुमंत यांच्या वेशभूषा स्वरुपातील बाल कलाकारांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्यात आली. ’प्रभू रामचंद्र की जय’ आणि ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो’, ‘थापाड्या रावण भस्मसात करु’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला होता. तसेच कार्यकर्त्यांमध्ये अनोखा उत्साह निर्माण झाला होता. 

Post a Comment

0 Comments