सातारा
सोयाबीनला योग्य दर मिळत नसल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शनिवारी आक्रमक झाले. सकाळी कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनची पोती ओतून सरकारचा निषेध केला. तसेच पालकमंत्री विजय शिवतारे व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या गाड्यांचा ताफा अडवून मंत्र्यांना जाब विचारला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोयाबीन ओतून राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. पोलीस कार्यकर्ते यांच्यात अक्षरशः धरपकड झाली. यावेळी आक्रमक झालेल्या 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शनिवारी सातार्यात आलेल्या पालकमंत्री विजय शिवतारे आणि मंत्री महादेव जानकर यांच्या गाड्या संतप्त कार्यकर्त्यांनी अडविल्या. यावेळी सोयाबीनच्या दराबाबत होत असलेल्या दुर्लक्षासाठी मंत्र्यांना जाब विचारून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जाताना पालकमंत्री विजय बापू शिवतारे यांनी आंदोलक शेतकर्यांची भेट घेतली व मला निवेदन सादर करा मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो व मार्ग काढू असे आश्वासन दिले.
0 Comments