सातारा
झी - मराठी वाहिनीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेत गडकिल्ल्यावरील तोफेवर बसून आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याने तमाम शिवप्रेमींच्या भावनेला हात घातला आहे. संबंधित मालिकेच्या निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी त्याच मालिकेत जाहिरपणे माफी मागावी, अन्यथा पोलिसांत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी साताऱयातील शिवप्रेमींनी करत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना निवेदन दिले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलिसांत गुन्हाही दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. सातारा ही मराठय़ांची राजधानी असून या राजधानीतील शिवप्रेमी व गडकोटभक्त आक्रमक झाले असून त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे ‘तुझं माझं ब्रेक अप' या मालिकेतील विकृत चित्रीकरणाला थेट सातारी दणकाच दिला आहे.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना निवेदन देताना धर्मवीर युवा मंचचे संस्थापक प्रशांत जगताप, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे सुदामदादा गायकवाड, दीपक प्रभावळकर, स्मितल प्रभावळकर, अविनाश कोळपे, उदयसिंह पाटील, अमोल खोपडे, सागर घोडके, सागर कदम, गणेश अहिवळे, नीलेश चव्हाण, प्रसन्ना जाधव, अजय देसाई, सागर शेळके, संतोष देशमुख, दयानंद नलावडे, नीलेश झोरे, यांच्यासह दुर्ग संमेलन समिती, राजस्वराज्य प्रतिष्ठान, शिवसंस्कृती दुर्गसंवर्धन समिती, शिवजयंती उत्सव समिती कोयनानगर आदी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दीपक प्रभावळकर म्हणाले, सातारा ही गडकोटांची भूमी आहे. येथील नागरिकही गड, किल्ल्यावर प्रेम करणारे आहेत. नुकतीच एका वाहिनीवर तुझं माझं ब्रेक ही मालिका प्रदर्शित झाली. हिरो आणि हिरोईन एका किल्यावरील तोफेवर प्रणयसिन करत आहेत असे दाखवले गेले. ज्याप्रकारे हे प्रदर्शित करण्यात आले त्यावरुन शिवप्रेमींच्या भावना निश्चित दुखावल्या आहेत. आम्ही गडकोटावर प्रेम करणारी माणसं आहोत. रायगडाची माती आमच्या घरात पुजली जाते. तोफ हे मुख्य शस्त्र आहे. त्याच शस्त्राची अवहेलना झाली. तलवारी सापडल्या तर त्या पुरातत्व खात्याकडे जमा केल्या ही आमची संस्कृती आहे. ज्यांच्याकडून ही चूक झाली आहे त्यांनी आमची माफी नाही मागायची. ज्या मालिकेतून हे प्रसारित करण्यात आले त्याच मालिकेतून जाहीर मागी मागावी. शिवभक्तांकडून गडकोट प्रेमींकडून सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रशांत नलावडे म्हणाले, ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं. रयतेच्या रक्षणासाठी गडकोट उभे केले. त्या गडकोटाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. जे विकृत प्रक्षेपण करुन मालिकेत दाखवले गेले आहे. त्याविरोधात आम्ही गुन्हा दाखल करत आहोत, असा प्रकार होवू नये. तुझं माझं ब्रेकअप' मालिकेत दाखवण्यात आलेला विकृत प्रसंग चुकीचा आहे. या भागात अभिनेत्री (केतकी चितळे) मद्य पिऊन नशेमध्येच किल्ल्यावर जात असल्याचा प्रसंग चित्रीत करण्यात आला आहे. मद्यधुंद असलेल्या या अभिनेत्रीचा तोल जात असल्याने तिचा सहकलाकार तिला सावरत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर ही अभिनेत्री किल्ल्यावरील तोफेवर बसून वेडावाकडा अभिनय करताना, तसेच नशेमुळे तोफेवर झोपत असल्याचे दाखवण्यात आले आहे. शेकडो मावळ्यांनी प्राणत्याग करून स्वराज्याची शक्तीस्थाने असलेले किल्ले जिंकले, निर्माण केले. याची थोडीही जाणीव मालिकेतील कलाकारांना, दिग्दर्शकांना राहू नये, हे संतापजनक आहे. हा पुरातन ठेव्याचा अपमानच आहे, असेही त्यांनी सांगितले. रात्री उशिरा सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

0 Comments