सातारा, 18 ऑक्टोबर-
कर्जमाफीची घोषणा करुन व त्या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देवून त्यांचाच अवमान या सरकारने केला असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सातार्यात केला.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंडे म्हणाले, हे सरकार सत्तेवर आल्यापासून सरकारची आर्थिक निती बरोबर दिसत नाही. पहिल्या अधिवेशनापासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारवर विरोधची झोड उठवली जात आहे. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. हे जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे रोष सातत्याने निर्माण होवू लागला आहे. कर्जमाफीचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. दिवाळीत पैसे देतो म्हणाले होते. अजूनही शेतकर्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 25 शेतकर्यांना बोलवले आहे. राज्याच्या ठिकाणी दोंन शेतकर्यांना बोलवले परंतु प्रत्यक्षात कर्जमाफी दिली गेली नाही. केवळ दिखावा केला जात आहे. या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना हे नाव दिले आहे. वास्तविक त्यांचे नाव जोडून अपमानच केला आहे.
या सरकारच्या काळात शेतकर्याच्या मालाला हमी भाव नाही, परतीच्या पावसाने नुकसानीची भरपाई नाही, अर्ध राज्य भारनियमनात तर अर्ध वीज विकण्यामुळे अंधारात बुडाले आहे. ऐन दिवाळीत रेशनवरील साखर बंद केली, जीएसटी, नोटाबंदी, महागाई यामुळे जनता मेटाकुटीला आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारला तीन वर्ष झाली आहेत. या सरकारने घेतलेले निर्णय चुकीचे आहेत. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस टप्याटप्याने रस्त्यावर उतरणार आहे. संघर्ष करणार आहे, असा इशाराही मुंढे यांनी दिला.

0 Comments