सातारा
मोक्काअंतर्गत अटकेत असलेल्या प्रमोद उर्फ खंड्या धाराशिवकर याच्या विरोधात शनिवारी रात्री सावकारी, खंडणी, जबरी चोरीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे या टोळीत सातारचा नगरसेवक बाळू खंदारे असल्याचे असल्याचे नमूद असून बाळूनेच फिर्यादीला पिस्तूलने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद आहे. याप्रकरणी याप्रकरणी बाजीराव शहाजी जगदाळे (वय 48, रा.आनंदनगर, संभाजीनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
खंड्या नाना धाराशिवकर, शंकुतला बाळासाहेब धाराशिवकर, कुबड्या उर्फ अमित अशोक कुरणे, नगरसेवक बाळू खंदारे, अमोल देशमुख, जमीर पठाण, आजमर शेख, योगेश लांडगे व अनोळखी 3 (सर्व रा.सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार जगदाळे हे चालक असून त्यांची दोन वाहने आहेत. दि. 16 ऑगस्ट 2013 ते 25 नोव्हेबर 2017 या कालावधीत ही घटना घडली आहे. कर्ज फेडण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने ते खंड्या धाराशिवकरला भेटले. सुमारे तीन टप्प्यात तक्रारदार यांनी खंड्याकडून 2 लाख रुपये 15 टक्के व्याजाने घेतले. सुरुवातीला ठरलेल्या व्याजाच्या रकमेप्रमाणे तक्रारदार खंड्याला पैसे देत होते. एक-दोनदा हते देण्यास वेळ झाल्याने खंड्याने दंडासह पैसे वसूल केले. अशाप्रकारे तक्रारदार यांनी व्याजापोटी घेतलेल्या 2 लाख रुपयांच्या मोबदल्यात तब्बल 9 लाख 61 हजार रुपये परत केले.
पैसे दिल्यानंतरही संशयित खंड्या धाराशिवकर हा त्याच्या टोळीबरोबर रात्री, अपरात्री घरात घुसून पैशाचा तगादा लावायचा. यावेळी संशाजयत घरात नको त्या भाषेत बोलायचे. अखेर एकदा 1 लाख रुपये देण्यासाठी गेल्यानंतर खंड्याने त्यावेळी पैसे व दुचाकी जबरदस्तीने ठेवून घेतली. संशयितांनी जबरदस्तीने कारमध्ये घालून चारभिंती परिसरात नेले. त्यावेळी बाळू खंदारे याने त्याच्या कंबरेला खोचलेली बंदूक दाखवत पैसे न दिल्यास खलास करण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
संशयितांकडून सावकारी प्रकरणात वारंवार त्रास होत असल्याने अखेर बाजीराव जगदाळे यांनी शनिवारी रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
बाळूलाही लागणार मोक्का?
सुरुचि राडा प्रकरणात बाळू खंदारेचे नाव असून अद्याप त्याला अटकपूर्व जमीनही मिळालेला नसल्याने तो गायब आहे. खंडणीचा गुन्हा दाखल असलेला फलटणचा नगरसेवक सनि अहिवळे यालाही मोक्का लागला असून आता आणखी एका मोक्का लागलेल्या खंड्याच्या टोळीत आणि खंडणीच्या गुन्ह्यात सहभाग समोर आल्याने बाळूलाही मोक्का लागू शकतो, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

0 Comments