Ticker

6/recent/ticker-posts

चंदनाची सावली


आदरणीय दादांचा सोमवारी १३ रोजी प्रथम स्मृतिदिन त्यानिमित्त 

दादा, चंदनाप्रमाणे स्वत: झिजत राहून आपल्या कुटूंबाला व समाजाला सुगंध देणारे आपले व्यक्तीमत्व. आयुष्याच्या अखेरपर्यंत आपला ध्यास आणि श्‍वास  कर्म आणि त्याग यासाठीच आपण  समर्पित केलात. कुटूंबप्रमुख म्हणून सर्व जबाबदार्‍या पार पाडीत असताना सर्वांनी स्वावलंबी बनवले. संतप्रवृत्तीचे आपले जीवन सर्वांनाच प्रेरणा आणि स्फूर्ती देणारे ठरले. शेतीतील तुम्ही सम्राट होता. विविध प्रयोग करून उत्तम शेती केली. आदर्श शेतकरी म्हणून आपला गौरव झाला. शेतीतून देखील माणूस श्रीमंत बनतो हा वस्तूपाठ तुम्ही शेतकर्‍यांना घालून दिला. भावाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वत: शाळा सोडून रोजगार करून भावाला पैसा पुरवला त्यामुळे तुम्ही याकाळातील राम ठरता. काळी माती हीच तुमची आई होती. वर्षाचे सर्व ऋतु तुम्ही शेतातच पाहिले. मनाची प्रसन्नता आणि समाधानी वृत्ती तुमच्या हृदयात होती. हीच तुमची श्रीमंती होती. आपली अर्धांगिनी श्रीमती कमळाबाई हिची साथ आणि आपला कष्टाचा हात त्यामुळे तुमचे शिवार सतत ऊसाच्या पिकाने आणि भाजीपालाने डवरलेले असायचे. तुमची शेती पाहायला येणारा माणूस मोकळ्या हाताने कधी जायचा नाही. शाळेतील विद्यार्थ्यांना ऊस खायला मिळावा म्हणून शेतातून तुम्ही गाडीभर ऊसाच्या मोळ्या आणल्या आणि ण शेंगाचे पोते मोकळे करून विद्यार्थ्यांना गुळ शेंगा खायला दिल्या. असे तुमच्या मनाचे दातृत्व विशाल होते. नातेवाईक आणि मित्रमंडळीत तुम्ही लोकप्रिय होता. मुलांचे तुम्ही लाडके आणि कर्तव्यदक्ष वडील होता. नातवंडांचे तुम्ही प्रेमळ आजोबा होता. आज तुमची नातवंडे स्वकर्तृत्वाने डॉक्टर, प्रोफेसर, शासकीय सेवेत विराजमान आहेत. सातारा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील आपला नातू आहे. आपल्यातील उत्तम गुण सर्वांनीच स्विकारले आहेत. त्यामुळे सर्वजण उत्तम नागरिक म्हणून लोकप्रिय आहेत. आपला मोठा मुलगा रविंद्र उत्तम शेतकरी आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून सर्वांना प्रिय आहे. धाकटा मुलगा राजेंद्र मफतलाल टेक्सटाईलमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. सांगली जिल्ह्यातील कामेरी ही आपली जन्मभूमी व कर्मभूमी. गावातील अबालवृध्द आपणास कार्यामुळे ओळखतात. भरलेल्या आकाशात भरपूर चांदण्या असाव्यात पण चंद्र ढगाआड जावा, अशी सर्व कुटूंबियांची अवस्था आहे. आपणास आपल्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शतश: प्रणाम.
सौ. शारदा बबनराव कदम

Post a Comment

0 Comments