Hot Posts

6/recent/ticker-posts

लोणंद परिसर दरोड्याने हादरला, लाखोंच्या ऐवजावर सशस्त्र डल्ला


कय्युम मुल्ला / लोणंद यांजकडून 
उंब्रज परिसरात पडलेल्या सशस्त्र दरोड्याला 24 तास उलटायच्या आतच लोणंद परिसर पुन्हा एकदा सशस्त्र दरोड्याने हादरला आहे. येथून 3 किलोमीटरवर असलेल्या पर्‍हर खुर्दमध्ये दरोडेखोरांनी चक्क घराची कौले काढून घरात प्रवेश केला. घरातील नागरिकांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत लाखोंचा ऐवज या दरोडेखोरांनी लुटला आहे.
लोणंदपासून फलटण रस्त्यावर 3 किलोमीटर अंतरावर  पर्‍हर खूर्द (ता. फलटण) हे ठिकाण आहे. नीरा देवघर धरणग्रस्त प्रकल्पातील विस्थापित झालेले हे पुनर्वसित गाव असून गावातील लक्ष्मण सखाराम साने यांच्या राहत्या घरावरील कौले काढून काही ÷अज्ञात दरोडेखोरांनी बुधवारी रात्री घरात प्रवेश केला. घरातील लोकांना जिवे मारण्याची धमकी देत कपाटे फोडून सुमारे 07 ते 08 तोळे सोने, 250 ग्रॅम चांदी तसेच 32 इंची एलसीडी टीव्ही, 30 हजार रुपये  रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे.
घरात शिरलेल्या दरोडेखोरांनी घरातील वयोवृद्ध महिलेस मारहाण ही केली आहे. सुमारे 450 लोकसंख्या असलेल्या या गावातील लोक भयभीत झाले असून लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे साहेब यांनी याबाबत माहिती कळताच घटनास्थळी भेट दिली व तपासाची सूत्रे गतिमान केली. या दरोड्यातही आंतरराज्य टोळीचा समावेश असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली. 




एसपी साहेब अ‍ॅक्शन प्लॅन राबवाच

उंब्रजच्या दरोड्यात प्रतिथयश मुल्ला कुटुंबियांच्या आधारस्तंभ असलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच या परिसरात धुमाकूळ घातल्यानंतरच्या दुसर्‍याच दिवशी लोणंद परिसरातील दरोडा सत्राने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धडाकेबाज कारवाईसाठी प्रसिद्ध असलेल्या एस. पी. संदीप पाटील यांनी सध्या ‘मोक्का’ अस्त्राने अनेक टोळ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. आता पाटील साहेबांनी तातडीने अ‍ॅक्शन प्लॅन करून या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments