Hot Posts

6/recent/ticker-posts

महावितरणचा भोंगळ कारभार, वीज कनेक्शन नसतानाही २० हजार ४७० रुपयांचे आले बिल


फलटण/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
तरडफ ता. फलटण येथील शेतकरी अंकुश अलगुडे यांची १० वर्षापूर्वी बुजवलेल्या विहिरीवर कोणतीही पाण्याची मोटार नसताना, विहिरी जवळ कोणतेही शेत पंपाचे महावितरणचे वीज कनेक्शन नसताना महावितरण फलटण ग्रामीण कार्यालयाने शेतकऱ्यास २० हजार ४७० रुपयांचे वीज बिल पाठवले. हे वीज बिल मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांने याबाबतची तक्रार आज कृषि उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत रामराजे शेतकरी व्यथा निवारण केंद्राकडे लिखित स्वरूपात दाखल केली.

शेतकरी अंकुश अलगुडे यांनी श्रीमंत रामराजे शेतकरी व्यथा निवारण केंद्राकडे दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, दहा वर्षांपूर्वी त्यांचे शेतात असणाऱ्या विहिरीवर  पंपासाठी वीज कनेक्शन होते, त्याचा ग्राहक क्रमांक २०२८९०४३३७६८ असा होता. परंतु काही कारणास्तव त्यांनी दहा वर्षांपूर्वी आपली विहीर बुजवली व विहिरीवरील वीज कनेक्शनही बंद केले. सध्या तेथे कोणतेही वीज कनेक्शन अथवा लाईटचा पोल नाही, असे असतानाही महावितरण कंपनीने मात्र जून २०१७ पर्यंतचे वीज बिल पाठवले आहे.

पाठवलेल्या वीज बिलामध्ये चालू रिडींग, मागील रिडींग व एकूण वापरलेली वीज या कॉलम मध्ये काहीही दर्शविलेले नाही ते निरंक आले आहे हे बिल अश्वशक्ती(एचपी) प्रमाणे अनमीटर्ड वीज देयक रक्कम २०४७०/- रुपये पाठवले आहे.


अंकुश अलगुडे यांना वीज बिल हातात पडल्यावर धक्का बसला. यानंतर महावितरणने केलेल्या अन्यायाची तक्रार श्रीमंत रामराजे शेतकरी व्यथा निवारण केंद्राकडे केली असता कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी तातडीने याची दखल घेत, महावितरण कंपनीला तक्रार अर्जासोबत नोटीस पाठवून सदरचा अन्याय तातडीने दूर करण्यास सांगितले आहे. श्रीमंत रामराजे शेतकरी व्यथा निवारण केंद्राकडे सर्वाधिक तक्रारीं महावितरणच्या प्राप्त होत असून येणाऱ्या काळात महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या अनेक भानगडी बाहेर पडणार आहेत.

Post a Comment

0 Comments