पुस्तकाचे गाव/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
पुस्तकाचे गाव भिलार येथे मराठी साहित्य आणि संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. विविध साहित्य उपक्रमांची मालिका सुरु असून त्या मालीकेतील एक सुंदर पुष्प शनिवार दि.23 डिसेंबर रोजी गुंफले गेले. भिलार गावातील श्री जननीमाता मंदिर सभागृहात सुप्रसिद्ध गायक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या 'कवितेचं गाणं होतांना...!' या मैफीलीचे आयोजन करण्यात आले होते. घनगर्द निसर्ग आणि नीरव शांततेचा परिसर अशा अनुपम वातावरणात, रसिकांच्या उदंड प्रतिसादासह मैफीलीला उत्तरोत्तर रंग चढत गेला.
या मैफीलीत संत कवींपासून ते आधुनिक कवींच्या कवितांबाबत सलील कुलकर्णी यांनी रसिकांशी संवाद साधला. कवितेचं गाण्यात होणारं रुपांतर आणि कवितांचा आशय यांबाबतच्या सुंदर सुरस्वादाचा अनुभव मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी घेतला. मुलाखतकार अस्मिता पांडे यांनी सलील कुलकर्णी यांना बोलतं केलं, तसेच आदित्य आठल्ये (तबला) व रितेश ओहोळ (गिटार) यांनी अनुरूप साथसंगत केली.
बेंगळुरु, मुंबई, पुणे, नवी मुंबई, वसई, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, पंढरपूर, वाई, महाबळेश्वर, पाचगणी अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून या कार्यक्रमास रसिक (पूर्वनोंदणी करून) उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे योजण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भिलार गावातील वळणावळणांवर बा. भ. बोरकर, शान्ता शेळके, विंदा करंदीकर, स्वा. सावरकर, ग्रेस, सुधीर मोघे आदी सुप्रसिद्ध कवींच्या कवितांसह संत तुकाराम व संत नामदेव यांच्या अभंगांचे आकर्षक फलक लावण्यात आले होते. या फलकांमुळे गावातील वातावरण अधिक काव्यमय झाले होते.
कविता हा साहित्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. मराठी साहित्यात कवितांचे अढळ स्थान आहे. कवितांना सुंदर चाली लावल्यानंतर त्या वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. याचाच आधार घेऊन डॉ. सलील कुलकर्णी यांनी 'कवितेचं गाणं होतांना...!' अशी अभ्यासपूर्ण वेबसीरीज निर्माण केली. या मालिकेची समारोपाची मैफील पुस्तकांच्या गावी शनिवारी संपन्न झाली. या कार्यक्रमाला रसिकांनी अभूतपूर्व हजेरी लावली. पुस्तकांच्या गावात नियमितपणे होत असलेल्या विविध साहित्यिक उपक्रमांबाबत उपस्थित रसिकांनी खूप समाधान व्यक्त केले. या मैफीलीला भिलार परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
0 Comments