दहिवडी@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
आधी सुस्तावलेल्या परंतु माफिया अंगावर येताच बिथरलेला महसूल विभाग आता चांगलाच कामाला लागला आहे. माण तालुक्यात तर महसूल खात्याचा धडाका सुरु असून दोन दिवसत तब्बल 700 ब्रास वाळू चोरीचा पंचनामा करण्यात आला आहे. याप्रकरणी 32 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात सर्वत्र वाळू माफियांनी हैदोस घातला असताना महसूलचे त्याला छुपे अभय होते. त्यामुळेच कारवाया होताना दिसत नव्हत्या. परंतु, वाळू चोरीतून मुजोर झालेल्या माफियांनी मागे-पुढे न पाहता चक्क यंत्रणेला टार्गेट करायला सुरवात केली. कुठे तलाठ्याच्या अंगावर डंपर घाल, कुठे कोतवालाला मारहाण कर, असे प्रकार सुरु केल्याने. सुस्तावलेली महसूल यंत्रणा खवळली.
त्यातच प्रसारमाध्यमांनीही ही प्रकरणे लावून घेतल्याने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत. जिल्ह्यातील प्रांतांच्या बैठकीत चांगलीच झापाझापी केली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रांत कामाला लागले. फलटणला काल दालवडीतील वाळुचोरी प्रकरणी दंड झाला होता आता. माणमध्येही कारवाईने जोर पकडल्याचे दिसून आले.
सुटी असताना प्रांतांपासून तलाठ्यापर्यंत सगळे झाडून कामाला लागले असून दोन दिवसांत 725 ब्रास चोरीला गेलेल्या वाळूचे पंचनामे करण्यात आले आहेत.
तालुक्यातील ओढे नाले व संपुर्ण माण नदी व माण मधील सर्व तलाव पूर्ण पालथे घालून शेकडो ब्रास वाळू जप्त केली आहे. तसेच अनेक वाहने पकडून आणली आहेत.
माणध्ये सहा भरारी पथके तयार करण्यात आली असून धडक कारवाया सुरु आहेत. पिंगळी तलावातून 55 ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. अजून ही तेथील कारवाई चालू आहे. ठिकठिकाणची वाळू जप्त करून तहसील कार्यालयात आणून डेपो मारले जात आहेत.
मात्र, ही कारवाई केवळ दिखावा ठरू नये, कायमस्वरुपी वाळूचोरीला पायबंद बसावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment