प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत राज्यातील 26 प्रकल्प आहेत, त्यातील 7 प्रकल्प एकट्या सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याची हजारो एकर जमिन ओलिताखाली येणार आहे. तसेच राज्य सरकार उपसा सिंचन योजनेचे जे वीज बील येईल त्यातील 81 टक्के वाटा उचलणार असून शेतकऱ्यांना केवळ 19 टक्के वीज बील भरावयाचे असल्याची महत्वपूर्ण माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा देताना सांगितली.
येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री. शिवतारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचाकार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर परेड कमांडर नंदापराजे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस व्हॅनमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. त्यात पोलीस, गृहरक्षक दल, विविध शाळांची आरएसपी, एनसीसी,स्काऊट गाईडची मुले व मुलींच्या पथकांचा समावेश होता. जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, शहीद कुटुंबीयांचे वीर माता, वीर पिता व वीर पत्नी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे म्हणाले, जयलुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015-16 मध्ये 215 गावांमध्ये 8 हजार कामे, 2016-17 मध्ये 210 गावांमध्ये 4 हजार 470 कामे पूर्ण व 780 प्रगतीथावर आहेत. तसेच 2017-18 मध्ये 210 गावांचा समावेश करण्यात आला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 46 गावांत टँकर बंद झाला असून 98 गावातील टॅंकरचा कालावधीत कमी झाला आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 26 प्रकल्प आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील 7 प्रकल्पाचा समावेश आहे. यामध्ये धोम बलकवडी, मोरणा गुरेघर, तारळी, कुडाळी, वांग मराठवाडी, उरमोडी, जिहे कठापूर चा समावेश आहे. सात प्रकल्पामधील 66 बाधीत गावे असून 41 गावांचे पूर्णत: जमीन वाटप झाले असून 25 गावांना अशत: वाटप करण्यात आले आहे. जिहे कठापूर, निरा देवधर, उरमोडी, तारळी, धोम बलकवडी, टेंभू खोडशी हे मोठे उपसा सिंचन प्रकल्प प्रगतीपथावर असून त्यमध्ये एकूण 796.76 दशला घनमीटर पाणीसाठा होत असून प्रकल्पांतर्गत सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर 1 लाख 13 हजार 870 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. उरमोडी अंतर्गत माण कालव्याचे काम जून 2018अखरे पूर्ण होणार आहे. वसना उपसा सिंचन योजनेंतर्गत कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील अवर्षण प्रवण क्षेत्र सिंचनापासून वंचीत आहे. यामध्ये 18 गावातील 5 हजार 400 हेक्टर जमीन बंदिस्त पाईपलाईनद्वारे ओलीताखाली येणार आहे. तसेच वाई तालुक्यातील कवठे-केंजळ योजना बंदिस्त पाईपलाईनद्वारे जून 2018 अखरे पूर्णत्वास येणार आहे. वांग मराठवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार 279 प्रकल्पग्रस्तांना देय जमीनीऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महू हातगेघर प्रकल्पामध्ये कावडी वहागांव येथील पात्र प्रकल्पग्रस्तांना जमीनी देण्याबाबत कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
जलसंधारण व उपसा सिंचन योजनेचे बील परवडत नसल्याने 19 टक्के शेतकऱ्यांचा हिस्सा व उर्वरित हिस्सा शासन भरणार आहे. कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांचे एकूण 1200 गेट आहेत. यातून एकूण 1 टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सचुनेनुसार या वर्षापासून 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या पधरवड्यात लोकशाही निवडणूक व सुशासन या विषयी समाजामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी मी प्रयत्नशील राहील. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनानं प्राधान्य दिलं आहे. त्यातून आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाहीही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी यावेळी दिली. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर येथील बसस्थानकाजवळच्या 1942 लढ्यातील भारतीय स्वातंत्र्याचे स्फुर्तीस्थान असलेल्या स्थळास पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी आज भेट दिली. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments