सातारा रोड (सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क): कोल्हापूर वनविभागाने टाकलेल्या धडक कारवाईत बिबट्याच्या दोन कातड्यांसह वन्यजीव तस्करीचे मोठे जाळे उघड झाले असून सातारा जिल्ह्यातील पळशी-सातारा कनेक्शन समोर आले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, सांगली व सातारा येथील एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले. कासव, खवले मांजर, दुर्मीळ वस्तू व काळ्या जादूसाठी लागणाऱ्या साहित्याच्या तस्करीचे धागेदोरेही उघड झाले आहेत.
▪️ शिरोलीत सापळा; कातडीसह चार जण ताब्यात
२९ मार्च रोजी शिरोली एमआयडीसी (ता. हातकणंगले) येथे पुणे-बेंगळुरू महामार्गावर सापळा रचण्यात आला. किया सेल्टॉस व फोर्ड फिगो या दोन वाहनांमधून बिबट्याची कातडी विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई झाली.
नसरुद्दीन हबीब शेख (रा. चाकूर, लातूर), समीर तातू तेजम (रा. कुडाळ, सिंधुदुर्ग), विजय विष्णू जमदाडे (रा. गोडोली, सातारा) व राकेश रमेश बांदेकर (रा. कुडाळ) या चौघांना दोन कातड्यांसह ताब्यात घेण्यात आले.
▪️ सातारा कनेक्शन; दोन आरोपी फरार, नंतर जेरबंद
कारवाईदरम्यान पांडू तात्या शिंदे (रा. मसुचीवाडी, वाळवा, सांगली) व शिवाजी शंकर सपकाळ (रा. पळशी, ता. कोरेगाव, सातारा) हे फरार झाले होते. पुढील तपासात दोघांना ताब्यात घेण्यात आले. पळशी कनेक्शनमुळे सातारा जिल्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला.
▪️ रत्नागिरी-सिंधुदुर्ग साखळी उघड
चौकशीतून शैलेश रघुनाथ इंदुलकर (रा. खेड, रत्नागिरी), जीवन भगवान तेजम व रवी भगवान तेजम (रा. चाफेली, कुडाळ) यांची नावे पुढे आली. बिबट्याची शिकार सिंधुदुर्गातील जंगलात केल्याचे उघड झाले.
यानंतर गजानन कृष्णा हळदे (रा. देवखिरकी, गुहागर), अनिल लक्ष्मण बसंतकर (रा. वाघंबे), पांडुरंग अंबाजी जाधव (रा. हेदवी) व विश्वनाथ प्रदीप मयेकर उर्फ गो गू मयेकर (रा. वेळणेश्वर) या साखळीतील आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला. बिबट्याची शिकार खाजगी जंगलात करून कातडी प्रक्रिया केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
▪️ वन्यजीव तस्करीचे मोठे जाळे
या प्रकरणात केवळ बिबट्याची कातडीच नव्हे तर कासव, खवले मांजर, दुर्मीळ नाणी-नोटा, पुरातन वस्तू व काळ्या जादूसाठी लागणाऱ्या साहित्याच्या तस्करीचे प्रयत्न समोर आले आहेत. परराज्यातील काही व्यक्तींचाही सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे.
▪️ वनविभागाची संयुक्त कारवाई
वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी एस., उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल विलास काळे, नंदकुमार नलावडे, प्रशांत आवळे, तसेच वनपाल व वनरक्षकांच्या पथकाने केली.
या कारवाईमुळे पश्चिम महाराष्ट्र-कोकण पट्ट्यात सक्रिय असलेल्या वन्यजीव तस्करीच्या जाळ्यावर मोठा आघात बसल्याचे मानले जात आहे. पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


0 Comments