मुंबई महानगर पालीका प्रशासनाने अग्निशमन दलाच्या अतुलनीय कामगीरीची दखल घेवुन माननिय आयुक्त यांच्या एक्स्ट्रा ऑर्डीनरी अवॉर्डने विनायक वसंतराव देशमुख मूळ रा. चाफळ यांचा गौरव करण्यात आला त्यानिमित्त त्यांच्या भावना त्यांच्याच शब्दात
1995 सालातल्या डिसेंबरमधे ( 12/12 ) मुंबई अग्निशमन दलात अग्निशामक म्हणून नोकरीला लागलो . आणी मुंबईच्या मेमनवाडा ( भेंडी बाजार ) या अती संवेदनशिल विभागात कर्तव्यावर रुजु झालो . सुरुवातीच्या दोन तिन दिवसातच तिथं नोकरी करणे म्हणजे एक दिव्य असल्याचं ध्यानात आलं ! कारण दररोज भरपुर काॅल व्हायचे . मुळातच हा इलाका मुस्लीम बहुल असल्यामुळे .. तसेच तेथील जुन्या सहका-यांना 1992-93 च्या दंगलीचा अनुभव असल्यामुळे ड्युटीवर आल्यावर मनावर एक प्रकारचा दबाव असायचा . एखाद्या ठिकाणी मोठी आग लागल्यावर आम्ही पोहोचताच फायर इंजीन मधुन उतरेपर्यंत तेथील पब्लीक गाडीवरील शिडी , होजेस तसेच इतर अग्निशमन साहीत्य बाहेर काढून पुढे घेवुन गेलेले असायचे . सर्व गुंतागुंत झाल्यामुळे काम करणे खुपच औघड व्हायचे . खरंतर पब्लीकचा आम्हाला मदत करण्याचा .. तसेच आग लवकरात लवकर विझावी हाच उद्देश असायचा . पण प्रशिक्षीत जवान आणि आम पब्लीक यात मोठा फरक असतो हे त्यांच्या ध्यानात यायचं नाही .. किवा त्यांना त्याची गरज सुद्धा नसावी . अतताईपणा , कधीकधी कर्मचा-यांना शिवीगाळ , मारझोड सुद्धा व्हायची . शिवाय रस्त्यावरील अतिक्रमणामुळे अग्निशमन वाहने दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचणे अत्यंत जिकीरीचे व्हायचे . परंतु उशिर झाल्यास त्याचे खापर अग्निशमन दलावरच फोडले जायचे . आणि हे अगदी नित्याचंच असल्यामुळे तिथे नोकरी करताना मनावर कायम दडपन असायचं !
अनेक वर्ष तिथला अनुभव असणारी मंडळी आम्हाला या बाबत नेहमीच सतर्क करत असायची . माझे साडु श्री प्रदीप शिंदे हे सुद्धा तिथेच कार्यरत असल्यामुळे खुपच आधार वाटायचा . भगवान जाधव , सतोसे , मोहन घोगळे , राजेंद्र कदम / पवार , दयानंद सावंत , भरत पाटील , अविनाश शिरगावकर , राऊ बुगडे , अरुण गणविर , विश्वनाथ तावरे , येवले , रज्जाक शेख , वाहीद शेख , दळवी , पाटील , देवरे , सुरेश जोसेफ आणि कित्तेक जुने जाणते जेष्ठ सहकारी व तेथील अधीकारी आम्हाला वर्दीवर मार्गदर्शन करायचे . ( सर्वांची नावे लिहीत नाही ) . माझ्या बरोबर रुजु झालेले संजय भोसले , सुरेश सांडगे , किशोर जाधव , संजय तांबे हे सुद्धा तिथेच ड्युटीला होते . आणि आम्ही नविन असतानाच नरिमन पाॅइंटच्या एक्स्प्रेस टाॅवर या 23 मजली इमारतीच्या 21 , 22 , 23 या तिन्ही माळ्यांना आग लागल्याचा काॅल मिळाला . लोकसत्ताचे मुख्य कार्यालय असलेल्या या गगनचुंबी इमारतीचे वरचे तिन्ही मजले गवताच्या गंजी सारखे धाडधाड जळत होते . तत्कालीन ADFO झंडवाल साो OIC नाईक साो यांच्या नेतृत्वाखाली आम्ही रवाना झालो . जेव्हा इमारतीत प्रवेश केला तेव्हा एक भिती मनाला स्पर्श करुन गेली .. कदाचीत आपण जिवंत खाली येणार नाही . धैर्य , धाडस , प्रसंगावधानता , आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर दुपारी उशिरा अग्निशमन दलाने आगिवर नियंत्रण मिळवले . सकाळची वेळ असल्यामुळे व कार्यालय बंद असल्यामुळे मोठी जिवीत हानी झाली नसली तरी एक सुरक्षा रक्षक आगिच्या भक्षस्थानी पडला होता . अनेक जवानांनी आपला जिव धोक्यात घालुन आपले कर्तव्य पार पाडले होते . तेव्हाच मला जाणीव झाली अग्निशमन जवान म्हणजे कधीही , कुठेही आपला जिव धोक्यात घालणे .
असे अनेक जिवघेणे प्रसंग अनुभवले . पण जेष्ठ सहका-यांच्या मार्गदर्शनाने आम्ही नवोदीत तावुन सुलाखुन निघालो . सुरुवातीला एखादी मोठी आग कंट्रोल झाल्यावरच आम्हा नवोदीतांना पुढे जायला द्यायचे . मी जरी एक्स्प्रेस टाॅवर अग्निप्रलय हे एकच उदाहरण दिले असले तरी ओळींच्या मर्यादेमुळे सर्वच दुर्घटनांचा उल्लेख करता येत नाही . पण अशा दुर्घटना या अगदी नित्याच्याच होत्या . काळबादेवी व भेंडी बाजार हा विभाग कित्तेक वर्ष जुन्या , मोडकळीस आलेल्या दाटीवाटीने वसलेल्या इमारतींनी व्यापलेला असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात किमान 2/3 इमारती तरी कोसळायच्या . कित्तेक जिव जायचे . शिवाय विमोचन कार्य सुद्धा अत्यंत जिकीरीचे असायचे .
मेमनवाडा नंतर काही वर्ष मुलुंड व आता विक्रोळी येथे कार्यरत आहे . नोकरीचं ठिकाण बदलं तरी काम आणि धोका आजही तोच आहे . अशा प्रकारे मुंबईकरांची मनोभावे सेवा करत असताना दिनांक 4/4/2013 रोजी संध्याकाळी मुंब्र्याच्या शिळफाट्यावर ' लकी कंपाऊंड ' ही 7 मजली इमारत कोसळल्याची वर्दी मुंबई अग्निशमन दलाला मिळाल्यावर ताबडतोब विक्रोळी व कुर्ला येथील रेस्क्यु टिम तिकडे पाचारण करण्यात आल्या . मी विक्रोळीच्या रेस्क्यु व्हॅन या आद्ययावत विमोचन वाहनाचं प्रतीनिधीत्व माझ्या सहका-यांसह करत होतो . तत्कालीन DyCFO श्री प्रभात रहांगदळे साो , परब साो , बंडगर साो तसेच इतर सहकारी जितेंद्र वेजरे , रमाकांत भोसले , मुकंद पाखरे , सुनील राऊत , गणेश थरवळ , किशोर म्हात्रे , संताराम तसेच , राजु दळवी आणखी बरेच सहकारी हे जेव्हा दुर्घटनास्थळी पोहोचलो तेव्हा तेथील परिस्थीती खुपच करुणाजनक होती . इमारतीच्या जमिनदोस्त झालेल्या ढिगा-या खालुन वाचवा वाचवा अशा आर्त किंकाळ्यांनी आसमंत सुद्धा शहारला होता . मन सुन्न झालं होतं , पण वेळ आलाप करण्याची नसुन ताबडतोब बचावकार्य सुरु करण्याची होती याचं आम्हा सर्वांनाच भान होतं . कसलाही विलंब न लावता बचावकार्य सुरु झालं . रेस्क्यु व्हॅनमधील चिपींग हॅमर धडधडु लागले . व्हिक्टीम लोकेशन कॅमेरा शोध घेवु लागला . हातोडे , कटर , लिफ्टींग बॅग्ज काम करु लागले . आणि एक-एक जखमींना आम्ही बाहेर काढु लागलो . तान्ही मुलं , मुली , तरुण - वृद्ध , स्त्रिया यांना अथकपणे .. तहान भूक विसरुन बाहेर काढण्याचं काम सुरु झालं . संध्याकाळी 8 च्या दरम्यान सुरु झालेलं काम .. उजाडल्याचं सुद्धा ध्यानात आलं नाही कुणाच्या . सकाळी 9 वाजे पर्यंत जवळजवळ 20 जखमींना आम्ही बाहेर काढून रुग्णालयात पाठवलं होतं . एका बाजुने NDRF व दुस-या बाजुने मुंबई अग्निशमन दल .. असं बचावकार्य अथकपणे सुरु होतं . कित्तेक जिव आम्ही वाचवले होते . एक तर आख्खं कुटुंब सुरक्षीत बाहेर काढण्यात आम्ही यशस्वी झालो होतो .
9 वाजता आमचे रिलीव्हर आल्यावर वरिष्ठांनी त्यांना घटनेचा , कामाचा चार्ज दिल्यावर आम्ही बाजुला झालो . पुन्हा नव्या जोमाने शोधकार्य सुरु झालं होतं . आज अनेक वर्ष उलटली . तोपर्यंत अनेक मोठ्या दुर्घटना मुंबई परिसरात घडल्या होत्या . काळबादेवी अग्निप्रलया नंतर इमारत कोसळुन शहीद झालेले आमचे सहकारी , लोटस दुर्घटना जिथं नितीन इवलेकर हा आमचा सहकारी शहीद झाला होता , नेव्हल डाॅकयार्ड बोटीतील अग्निप्रलय , डाॅकयार्ड रोड इमारत कोसळण्याची दुर्घटना अशा महा भयंकर दुर्घटना घडल्या होत्या . अनेक बळी गेले असले तरी कित्तेक जिव अग्निशमन दलाने वाचवले होते . मुंबई महानगर पालीका प्रशासनाने अग्निशमन दलाच्या या सर्व अतुलनीय कामगीरीची दखल घेवुन माननिय आयुक्त यांच्या Extra ordinary bravory award ने संबंधीत कर्मचा-यांचा गौरव करण्याचे निश्चीत केले होते . आणि आज दिनांक 25/01/2018 रोजी महापालीका सभागृहात हा काहीसा दु:खद तर भविष्यात अग्निशमन जवानांना प्रेरणादायी ठरेल असा गौरव सोहळा आयोजीत केला होता .
माननिय महापालीका आयुक्त श्री अजाॅय मेहता साो , महापौर श्री विश्वनाथ महाडेश्वर या महोदयांच्या हस्ते जवानांच्या निधड्या छातीवर अत्यंत सन्मानाने या दोन्ही महानुभावांनी पदक लावले . आणि प्रत्तेक जवान आपल्या अतुलनिय कार्यामुळे पाठीवर पडलेली ही थापच समजुन आनंदी झाला . सहा. आयुक्त कुंदन मॅडम , स्थाई समितीचे अध्यक्ष श्री कोरगावकर साो , CFO श्री रहांगदळे साो , DyCFO हिवराळे साो , Dy CFO परब साो , माजी CFO श्री जोशी साो , चौधरी साो , आम्हा सर्वांचे कुटुंबीय तसेच अनेक आदरणीय व्यक्ती उपस्थीत होत्या . मुंबई अग्निशमन दलाचे CFO श्री प्रभात रहंगदळे साो यांनी उपस्थीतांना दलाच्या कार्याची तसेच सदर दुर्घटनांस्थळी झालेल्या कार्याची माहीती दिली . श्री D S पाटील साो यांनी या महापालीका सभागृहात प्रथमच पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्याचं सुत्रबद्ध सुत्रसंचालन केलं .
पोट भरण्यासाठी मी स्विकारलेल्या या वृताने मला सुद्धा छातीवर पदक लागल्यामुळे या आगळ्या वेगळ्या आनंदाची अनुभुती दिली . त्यामुळे पुढे आणखी धैर्याने मुंबईकरांची सेवा करण्यासाठी आणखी बळ दिलं . इतर सर्व जवानांना प्रेरणा दिली . आणि मुंबई अग्निशमन दलाचा एक अविभाज्य भाग असल्याचा अभिमान वाटला ! आज गौरव झालेल्या सर्व सहका-यांचं अभिनंदन ! आणि सर्वांनाच शुभेच्छा !
धन्यवाद .... मुंबई महानगर पालीका
धन्यवाद ... मुंबई अग्निशमन दल
धन्यवाद ... मुंबईकर
धन्यवाद मित्रानो
*********
विनायक देशमुख
फायर फायटर
मुंबई अग्निशमन दल

0 Comments