Ticker

6/recent/ticker-posts

कोरेगावचे पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे निलंबीत, आयजींची कारवाई, कामकाजातील त्रुटी भोवल्या


कोरेगाव@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
कोरेगाव पोलीस ठाण्याचे कामकाज प्रभारी अधिकारी म्हणून करत असताना कामकाजामध्ये त्रुटी ठेवल्याप्रकरणी संभाजी म्हेत्रे यांना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी निलंबीत केले आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी काढण्यात आले. नूतन पोलीस निरीक्षक म्हणून दादासाहेब चुडाप्पा यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांनी दुपारीच पदभार घेतला आहे. 
संभाजी म्हेत्रे यांची दि. 24 जून 2017 रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती. त्यांनी कामकाज करत असताना कायदा व सुव्यवस्थेचे अनेक प्रसंग निर्माण झाले होते. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांची संख्या देखील दिवसागणिक वाढत चालली होती. त्यांच्या कामकाजाच्या पध्दतीवर वरिष्ठ अधिकार्‍यांनी अनेकदा प्रश्‍नचिन्ह उभे केले होते. पोलीस उपअधीक्षक कु. प्रेरणा कट्टे व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी म्हेत्रे यांच्या कामकाजातील त्रुटींवर आधारित निलंबनाचा प्रस्ताव विश्‍वास नांगरे-पाटील यांना सादर केला होता. त्या आधारे विश्‍वास नांगरे-पाटील यांनी म्हेत्रे यांना निलंबीत करण्याचा आदेश काढला. 
संभाजी म्हेत्रे यांच्या जागी पोलीस निरीक्षक म्हणून दादासाहेब चुडाप्पा यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी दुपारी पदभार स्वीकारला. चुडाप्पा यापूर्वी सातारा जिल्हा विशेष शाखेत काम पाहत होते. 1993 साली उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झालेल्या चुडाप्पा यांनी विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सेवा बजावली आहे. सांगली जिल्ह्यात वाहतूक शाखेचा पदभार त्यांच्याकडे होता. त्याचबरोबर महामार्ग वाहतूक सुरक्षा विभागात त्यांनी सेवा बजावली आहे.

Post a Comment

0 Comments