Ticker

6/recent/ticker-posts

वडूजच्या एका रेशन दुकानाचा परवाना कायमचा रद्द

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा
: धान्यवाटपातील अनियमितता व इतर दोषांमुळे वडूज, ता. खटाव येथील रास्त भाव दुकानदार प्रशांत किसन शेटे यांच्या दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचा निकाल जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिला आहे. शिवाय रेशन दुकानाची सर्व अनामत रक्कम जप्त करण्याबरोबरच दुकानदाराला 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश खटावच्या तहसिलदारांना देण्यात आले आहेत. 

 सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया सहसंयोजक  शेखर सुरेश पाटोळे यांनी याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 27 जून रोजी प्रशांत शेटे यांच्या रास्तभाव दुकानाची तपासणी करण्यात आली होती. शिधापत्रिका नसलेला फलक न दर्शवणे, वजन तराजू प्रमाणपत्र नसणे, अन्न औषध प्रशासनाचे प्रमाणपत्र नसणे याशिवाय सात व्यक्तींच्या नावे पावती काढून 14 व्यक्तींपैकी 5 जणांचे धान्य देणे, लाभार्थ्यांशी सौजन्याने न वागणे आदी बाबी आढळून आल्या होत्या. तसेच तपासणीवेळी 8.24 क्विंटल गहू व 11.41 क्विंटल जादाचा तांदूळ आढळून आला होता. 
याबाबत प्रशांत शेटे यांना आपली संधी मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्याबाबत त्यांनी लेखी खुलासाही पुरवठा विभागाकडे केला होता. यावर तपासणीनंतर पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी सदर दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश काढले. 
या आदेशात अनामत रक्कम जप्तीसोबत पाच हजार रुपये दंड, जादाचे धान्यशासन जमा करण्याबरोबरच या दुकानदाराकडे असलेल्या शिधापत्रिका ग्राहकांच्या दृष्टीने नजीकच्या दुकानाला जोडण्याचे आदेश दिले आहेत. 

सदरचा आदेश खटाव तहसिलदारांनी अर्जदार व तक्रारदाराला देऊन आदेशित कार्यवाही तात्काळ करत पुरवठा कार्यालयास स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे निर्देश निकालपत्रात देण्यात आले आहेत. 

Post a Comment

0 Comments