Hot Posts

6/recent/ticker-posts

‘स्वाभिमानी’चा दणका, ‘माणगंगा’चे थकित बील बँकेत जमा


कराड/सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्याने सातारा जिल्यातील शेतकर्‍यांचे ऊस बील गेल्या दीड वर्षांपासून थकविले होते. याप्रकरणी आक्रमक भूमिका घेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आले असून ‘स्वाभिमानी’च्या दणक्याने माणगंगा साखर कारखान्याने जिल्हा बँकेच्या जयराम स्वामी वडगाव शाखेत जमा केले.
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी भागातील चोराडे, रहाटणी, वडगाव, गोरेगाव या गावातील शेतकर्‍यांनी सन 2016 च्या गळीत हंगामामध्ये आटपाडी येथील मानगंगा साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी घातला होता. त्यावेळी माणगंगा साखर कारखान्याने 2800 रुपये प्रति टन दर जाहिर केलेला होता. त्यानुसार पहिला हप्ता 1700 रुपये प्रमाणे शेतकर्‍यांना मिळाला. परंतु, दुसरा हप्ता 1100 रूपये प्रमाणे फक्त डिसेंबरपूर्वी ऊस गाळप झालेल्या शेतकर्‍यांना मिळाले होते. त्यानंतर ऊस गेलेल्या शेतकर्‍यांना फक्त 1700 रुपये पहिला हप्ता मिळाला होता, दूसरा 1100 रूपयाचा हप्ता डिसेंबर नंतरच्या शेतकर्‍यांना दिला गेला नाही. या शेतकरयांनी वर्षभर वारंवार माणगंगा वर हेलपाटे मारले परंतु आश्‍वासनापलीकडे काही मिळाले नाही. अगदी कारखान्याने शेतकर्‍यांना ऊस बिल रकमेचे दिलेले चेक ही वठले नव्हते.
गेल्या महिन्यापुर्वी या शेतकरयांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संपर्क साधला होता. त्यानुसार स्वाभिमानी चे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृवाखाली आटपाडी येथे तहसील कार्यालायावर सातारा जिल्हातील शेतकर्‍यांनी मोर्चा काढला होता यावेळी सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानी चे पदाधिकारी प्रवक्ते महेश खराडे, जिल्ह्याध्यक्ष विकास देशमुख, सयाजी मोरे, भागवत जाधव, राहुल बिडवे, उपस्थित होते.
यावेळी तहसील कार्यालयात कारखांना प्रशासन, स्वाभिमानी चे पदाधिकारी व शेतकरी यांची बैठक झाली. तेव्हा 20 तारखे पर्यंत मोर्चावेळी उपस्थित असणार्‍या शेतकरयांची  व 5 मार्च पर्यंत इतर शेतकर्‍यांचे बील काढण्याचे कारखांना प्रशासनाने मान्य केले होते. ठरलेल्या वेळेत बील दिले नाही तर कारखान्याचा चालू गळीत बंद पाडण्याचा ईशारा स्वाभिमानी चे जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिला होता.
या आंदोलनाची दखल घेवून मोर्चाला उपस्थित असणार्‍या शेतकर्‍यांचे पैसे माणगंगा प्रशासनाने बँकेत जमा केले आहेत हे ‘स्वाभिमानी’च्या आटपाडीत केलेल्या आंदोलनाचे यश असून जोपर्यंत सर्व शेतकर्‍यांना पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आमचा लढा सुरु राहणार असल्याचे नलवडे यांनी दैनिक सत्य सह्याद्री प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 

Post a Comment

0 Comments