Hot Posts

6/recent/ticker-posts

ठोस निर्णय न झाल्यास कोयना धरणग्रस्त पेटून उठणार. मुख्यमंत्र्यांनी आंदोलन ठिकाणी यावे. डॉ. भारत पाटणकर.



पाटण @  सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
 मुख्यमंत्र्यांनी कोयना धरणग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आंदोलन ठिकाणीच यावे. कोयनेचा  धरणग्रस्त आता पेटून उठला आहे. ठोस  निर्णय झाल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही. असा इशारा देऊन हा लढा आणखी तिर्व करणार असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी  कोयना येथे दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या कोयना धरणग्रस्तांच्या आंदोलनात सांगितले.

पुनर्वसनाच्या विविध मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांनी दिनांक २६ फेब्रुवारीपासून कोयनानगर येथील छ. शिवाजी क्रिडांगणावर बेमुदत  ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी डॉ.भारत पाटणकर बोलत होते.

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रकल्पग्रस्त बंधू भगिनींनी कोयनामाईच्या पाण्याचे जलपूजन करून शपथ घेतली.आंदोलनात सहभागी सर्व प्रकल्पग्रस्तांनी कोयना धरणासमोर  कोयनामाईच्या काठावर उभे राहून जो पर्यंत शासन  आमचे १०० टक्के पुनर्वसन करून न्याय देत  नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू ठेवणार असल्याची सामुदायिक शपथ धरणग्रस्तांनी घेतली. या वेळी बोलताना श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष डाॅ. प्रशांत पन्हाळकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नेत्यांच्या वाढदिवसाला जायला वेळ आहे, पण कोयना प्रकल्पासाठी ज्यानी त्याग केला त्या कोयनेच्या धरणग्रस्तांसाठी त्यांना वेळ मिळत नाही हे दुर्भाग्य आहे, मुख्यमंत्र्यांनी  धरणग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात ताबडतोब निर्णय घ्यावा, नाहितर  कोयनेची विज,पाणी बंद करू, असा इशारा डाॅ पन्हाळकर यांनी दिला. दरम्यान आज सकाळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी.जी.पाटील, यांचेसह कोयनेचे कार्यकारी अभियंता गाडे,कमलाकर, साजिद मुल्ला  यांनी आंदोलन स्थळी भेट दिली.

पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर मोहिते  यांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन धरणग्रस्तांच्या आंदोलनाला पत्रकार संघाचा जाहीर पाठिंबा दिला. या आंदोलनाला  पाटण ता. शिवसेना ग्रुप ग्रामपंचायत रासाटी, मेंढेघर, हेळवाक विभाग बौद्ध विकास मंडळ, यांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. तसेच पाटण पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार, जिल्हा.प. स. सदस्य बापूराव जाधव सुभाषराव पवार, धर्यशिल पाटणकर यांनी उपस्थित राहून धरणग्रस्तांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

Post a Comment

0 Comments