Hot Posts

6/recent/ticker-posts

पाटणमध्ये कडकडीत बंद पाळून काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण - :  मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी औरंगाबाद येथील सखल मराठा समाजाचा युवक काकासाहेब शिंदे याने स्वत: चे बलिदान देऊन जलसमाधी घेतली. या युवकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी पाटण, मल्हारपेठ, नवारस्ता दौलतनगर  येथे मराठा समाजाने कडकडीत बंद पाळून श्रद्धांजली वाहिली.  यावेळी मराठा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. या बंद काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या युवकाने सोमवार एकादशी दिवशी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गोदावरी नदित स्वत: चे बलिदान देऊन जलसमाधी घेतली.  हि बातमी सोशल मीडिया आणि न्युज चॅनलच्या माध्यमातून पाटण येथे समजताच मराठा समाजाच्या भावना महाराष्ट्र सरकारच्या विरोधात तीव्र झाल्या. हे सरकार मराठा समाजाचा अजून किती अंत पाहणार अशा तीव्र भावना व्यक्त करून मंगळवारी सकाळी मराठा समाज पाटण शहराच्या नवीन एस.टी. स्टैंड, झेंडा चौक, लायब्ररी चौक या मेन बाजार पेठेत जमावाने उतरला आणि  पाटण शहरातील  सर्व दुकाने, व्यवसाय, बाजार पेठ बंद केला. यावेळी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन व्यापारी वर्गाने मराठा मोर्चाला प्रतिसाद दिला. तर खाजगी रिक्षा, वडाप, जिप वाहतूक हि बंद केली. 

छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशा  घोषणा देत नवीन  एस.टी. स्टैंड येथे कराड - चिपळूण रोडवर काही काळ रस्ता रोको करून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी घेऊन बलिदान दिलेल्या  औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या युवकाला मराठा समाजाने श्रद्धांजली वाहिली. तर मल्हारपेठ ग्रामपंचायत कार्यालय समोर आणि नवारस्ता येथे श्रद्धांजली वाहून मराठा समाजातील संतप्त   नागरिकांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागून  निषेध व्यक्त केला. यावेळी पाटण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यु. एस. भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व विविध मागण्यासाठी शनिवारीच पाटण तालुक्यातील मराठा समाजातील बांधवानी पाटण येथे उत्स्फूर्त बंद पाळून  झेंडा चौक ते तहसील कार्यालया पर्यंत पायी चालत मोर्चा काढला होता. व तहसील कार्यालयासमोर  ठिय्या आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त करत तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. तर मराठा महिला क्रांती मोर्चाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त सोमवारी येथील विठ्ठल मंदिरात महिलांनी विठ्ठलाची महापूजा, महाअभिषेक करून सरकारचा निषेध व्यक्त केला होता. यावेळी संघर्षाशिवाय मागण्या मान्य होणार नाहीत. त्यासाठी मराठा समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे. मराठा समाजाचा संयम सुटण्याची वेळ सरकारने पाहू नये. तातडीने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आता रडायची नाही तर लढाईची वेळ आली असल्याचा इशारा पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सरकारला देण्यात आला आहे. तर सरकारच्या निषेधार्थ ढेबेवाडी, तारळे, चाफळ येथे बुधवार दि. 25 रोजी बंद पाळण्यात येणार असून मोरगिरी येथे शुक्रवारी 27 रोजी बंद पाळण्यात येणार असल्याचे या विभागातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments