Hot Posts

6/recent/ticker-posts

विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी हिंगोली जिल्ह्यातील जाधव दाम्पत्याने केली विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


पंढरपूर : आषाढी वारीच्या निमित्ताने शासकीय महापूजेचा मान हिंगोली जिल्ह्यातील भगवंती- कडोळी गावातील अनिल गंगाधर जाधव व त्यांची सुविद्य पत्नी वर्षा अनिल जाधव या दाम्पत्याला मिळाला. या मानाच्या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे संपन्न झाली.



श्री विठ्ठल मंदिरात सोमवारी पहाटे २.२० वाजता मान्यवरांचे आगमन झाले. त्यानंतर जाधव यांनी सपत्नीक महापूजेला सुरूवात केली. शंख, घंटी व कलशाचे पूजन केले. आग, तेज, वायू, ऊर्जा, पाणी यांचे पूजन करून विठ्ठलाला अभिषेक केला. जलाभिषेकानंतर दूध, दही, मध, केशर यांचा अभिषेक करण्यात आला. सावळ्या विठूरायाला सुगंधी द्रव्य लावण्यात आले. महापूजेनंतर विठूरायाला तलम, मोरपंखी अंगरखा, जरीकाठाचे केशरी धोतर, अंगावर जरीचे उपरणे, मस्तकी सोन्याचा मुकुट तसेच गळ्यात तुळशीमाळा, पुष्पहार, कपाळाला चंदन टिळा व बुक्का लावण्यात आला. श्री विठ्ठलाला हा संपूर्ण पोशाख व अलंकार घातल्यानंतर विठूरायाचे रूप राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवि शशिकळा लोपलिया | कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रूळे माळ कंठी वैजयंती ॥ असे विलोभनीय दिसत होते.



श्री विठ्ठलाच्या महापूजेनंतर श्री रूक्मिणी मातेची पूजा विविध उपचार करून करण्यात आली. मातेचा मळवट चंदन व कुंकवाने भरण्यात आला होता. मातेला पोपटी रंगाची साडी नेसविण्यात आली होती तर मस्तकी सोन्याचा मुकुट परिधान करण्यात आला होता. मातेच्या मस्तकी मुकुट ठेवण्यापूर्वी शुभ शकुन म्हणून तो सर्व मान्यवरांच्या कपाळाला लावण्यात आला. मातेची महापूजा सुरू असतानाच श्री सुक्ताचे पठण सुरू होते. महापूजेनंतर उपस्थित मान्यवरांनी श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतले व पौराणिक परंपरा असणार्‍या गरूड खांबाला मिठी मारून आपल्या मनातील संकल्प व्यक्त केला.



 यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, खासदार अनिल देसाई, आमदार सुरेश खाडे, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शिवाजी मोरे, प्रकाश जवंजाळ, ऍड.माधवी निगडे, पुरस्कार समितीचे सदस्य सूर्यकांत भिसे, सचिन पुणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.


गेल्या चार वर्षापासून आषाढी वारी करणार्‍या अनिल गंगाधर जाधव व त्यांची सुविद्य पत्नी वर्षा अनिल जाधव (रा.भगवंती, पो. कडोळी, ता. शेणगाव, जि. हिंगोली) यांना यावर्षीचा आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान मिळाला. जाधव दाम्पत्याच्या हस्तेच यावर्षीची शासकीय महापूजा करण्यात आली. महापूजेनंतर मंदिराच्या सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने जाधव दाम्पत्याचा सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी गौरवीदेवी भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. मानकरी दाम्पत्याला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते एसटी महामंडळाच्यावतीने एक वर्ष मोफत एसटी प्रवास पासाचे वितरण करण्यात आले.


           

यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने निर्मल दिंडी पुरस्काराचे वितरण परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले. निर्मल दिंडी प्रथम पुरस्कार संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथापुढील शेडगे दिंडी क्रमांक ३ ला, व्दितीय पुरस्कार कोथळी येथील संत मुक्ताई दिंडीला तर तृतीय पुरस्कार संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दिंडीला देण्यात आला. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वारीदरम्यान उत्कृष्ठ काम करणार्‍या स्वयंसेवकांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अतुल भोसले यांनी केले. तर आभार गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मानले. 

विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी आषाढी वारीने पंढरीस आलेल्या श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत सोपानकाका, श्री संत निवृत्तीनाथ, श्री संत एकनाथ, श्री संत मुक्ताबाई, श्री संत नामदेव आदिंसह राज्यभरातून आलेल्या संतांच्या पालख्यांनी व त्यांच्यासमवेत आलेल्या सुमारे १० लाख वारकर्यांनी पंढरी नगरी दुमदुमुन गेली होती. सर्वत्र टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष सुरू होता. आज पहाटे पासूनच चंद्रभागेचा तीर वारकर्यांच्या गर्दीने फुलुन गेला होता. चंद्रभागेचे स्नान करून वारकर्यांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी दूरवर रांगा लावल्या होत्या. गोपाळपूरजवळील इंजिनिअरींग कॉलेजपर्यंत दर्शनबारी लागली होती. श्री संत ज्ञानदेवांच्या पादुका सकाळी ८ वाजता चंद्रभागा स्नानासाठी सोहळ्याचे मालक आरफळकर यांनी चंद्रभागेवर नेल्या. तेथून स्नान घालून त्या दर्शनासाठी मंदिरात आणण्यात आल्या. त्यानंतर सकाळी ११.३० वाजतां नाथ चौकातील ज्ञानेश्‍वर मंदिरात या पादुका आणण्यात आल्या. आलेल्या लाखो वारकर्यांनी व दिंड्यांनी चंद्रभागेचे स्नान, नामदेव पायरी, कळसाचे दर्शन घेवून नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. तसेच दुपारी फराळ घेवून ‘‘ जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता ’’असे म्हणत वारक-र्यांनी पंढरीचा निरोप घेतला.

Post a Comment

0 Comments