खटाव तालुक्याचा दुष्काळी टाहो पोहचला अधिवेशनात, आ.जयकुमार गोरे, आ.शशिकांत शिंदे, आ.बाळासाहेब पाटील झाले आक्रमक - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, November 19, 2018

खटाव तालुक्याचा दुष्काळी टाहो पोहचला अधिवेशनात, आ.जयकुमार गोरे, आ.शशिकांत शिंदे, आ.बाळासाहेब पाटील झाले आक्रमक


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क :- कायम टंचाईग्रस्त असणाऱ्या खटाव तालुक्याला  राज्यशासनाच्या दुष्काळी यादीतून वगळण्यात आल्याने तालुक्याचे तीनही लोकप्रतिनिधी आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक झाले. विधीमंडळाच्या प्रवेशद्वारावर आ. जयकुमार गोरे, आ.शशिकांत शिंदे, आ.बाळासाहेब पाटील यांनी धरणे देवून " खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, " तालुक्यात दुष्काळ जाहीर न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. तीनही आमदारांनी खटावमध्ये दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करणाऱ्या गांधी टोप्याही परिधान केल्या होत्या.


आज हिवाळी अधिवेशनाची मुंबईत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सरकारने फक्त दुष्काळ जाहीर केला मात्र दुष्काळी उपाययोजना लागू केल्या नाहीत. अनेक तालुक्यांना दुष्काळी यादीतून वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी निदर्शने केली. यावेळी बोलताना आ. जयकुमार गोरे म्हणाले की, चुकीच्या सर्वेक्षण आणि निकषांमुळे खटाव तालुल्याला दुष्काळी यादीतून वगळण्यात आले आहे. सॅटेलाइटद्वारे सर्वेक्षण करणाऱ्या सरकारलाच आता सॅटेलाइटवर पाठविण्याची वेळ आली आहे. तालुक्यात अत्यंत कमी पाऊस पडल्याने पेरण्या झाल्या नाहीत. खरिप आणि रब्बीचे दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. पाणी आणि चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे सरकारला खटाव तालुका दुष्काळी जाहीर करुन उपाययोजनाही त्वरित लागू कराव्या लागतील. अधिवेशनातच आम्ही सरकारला तसा निर्णय घ्यायला भाग पाडू. 

No comments:

Post a Comment