विशाल माने
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
देवापूर: विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अजूनही कुठलाच उमेदवार ठरत नसल्याने विधानसभेसाठी नंबर लागेल का नाही...? की अजून कोणाला संधी मिळणार याबाबत भावी आमदारांना धडकी भरली आहे. उमेदवारी निश्चित होत नसल्याने तळमळीने काम करणार्या कार्यकर्त्यांची फजिती होत आहे.आघाडीतील अनेकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भाजप-सेना युतीत अफाट भाऊगर्दी केली आहे.मात्र इच्छूकांची हीच भाऊगर्दी युतीसाठी एकवेळ संजीवनी ठरेल असे वाटत असताना आता मात्र हीच गर्दी युतीसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत आहे.
जिल्ह्यात अनेक मतदारसंघ असे आहेत की जिथे सेना व भाजपकडून एकाचवेळी एकाच जागेवर अनेकजण इच्छूक आहेत.त्यामुळे नक्की संधी कुणाला मिळेल आणि कुणाची डोळ्यावरची धुंदी ऐनवेळी उतरेल हे आताच सांगणे थोडे घाईचे ठरेल.त्यामुळे युतीतील स्वपक्षीय जुन्या नेत्यांबरोबरच पक्षांतर करून युतीत नुकताच प्रवेश केलेल्या अनेक नेत्यांना सध्या आपल्यालाच संधी मिळेल याची शक्यता कमी वाटत असल्याने अनेकांनी प्रचाराच्या वाटेवर न जाता,सध्या अधिक सावधगिरी बाळगल्याचे पहावयास मिळत आहे.
जागावाटपाचे घोडे अजूनही अडले आहे.त्यामुळे कोणत्या जागी कोणता नेता हे अजून निश्चित न झाल्याने कार्यकर्ते मात्र पुरते गोंधळलेले दिसत आहेत.निवडणुका इतक्या जवळ आलेल्या असतानाच आपल्या पक्षाचे उमेदवारच न ठरल्याने असंख्य कार्यकर्त्यांची धांदल उडालेली दिसत आहे.यापूर्वी चार-दोन महिने अगोदरच उमेदवार निश्चित असायचे त्यामुळे आपल्या प्रचाराच्या बदल्यात कार्यकर्त्यांना खर्चपाणी करण्याची जबाबदारी उमेदवार न सांगता उचलतात.यावेळी मात्र एकाही नेत्याने ही जबाबदारी न स्वीकारल्याने कार्यकर्त्यांचे खिसे मात्र रिकामेच दिसत आहेत .
त्यामुळे खिशात नाही दाना आणि हवालदार म्हणा काही अशीच कार्यकर्त्यांची अवस्था झाल्याचे चित्र दिसत आहे.अनेक वेळा ज्या नेत्यांचा कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला होता अशा नेत्यांनीही आज कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवल्याने नेते केवळ गरजेपुरता वापर करतात आणि काम झालं की सोडून देतात ही अक्कल कार्यकर्त्यांना येते की पुन्हा नोटा आणि दारुच्या मोहिनीपायी कार्यकर्ते स्वतःला त्याच नेत्याच्या दावणीला बांधून घेतात हे पाहावे लागेल.

0 Comments