Hot Posts

6/recent/ticker-posts

पक्ष सोडून जाणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी बघून माझं युट्यूबही रडलं-रामराजे

 
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण  :  पक्ष सोडून जाणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी बघून माझं युट्यूबही रडलं . त्यांच्या अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पेक्षा महाऑस्कर द्यावा.  सोळा संसार सांभाळणाऱ्यांना मला शिव्या घातल्याशिवाय झोप लागत नाही . दूध डेअरी विकणाऱ्यांनी व ज्यांना पाण्यातलं काही कळत नाही त्यांनी मी मंत्रिपदासाठी पाणी विकले , असे शिकवू नये अशी टीका उदयनराजे भोसले , जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्यावर करीत आमचं राजकारण त्यागाच आहे. विकृत मनोवृत्तीची माणस एकत्र येतात तेव्हा कधीही चांगलं घडत नाही त्यामुळे आपल्याला एकत्र राहावे लागणार आहे . दोन दिवसांमध्ये विधानसभेचा निर्णय घेणार असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले .
फलटण येथे राजे गटाच्या वतीने अनंत मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या युवा संवाद मेळाव्यात युवकांना मार्गदर्शन करताना रामराजे बोलत होते . यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण,जिल्हा परिषदचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर,मा.श्रीमंत सुभद्राराजे प्रतापसिंहराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब), पंचायत समितीचे सदस्य श्रीमंत विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर ,फलटण नगर परिषद नगराध्यक्षा  सौ.निताताई मिलिंद नेवसे, फलटण पंचायत समिती सभापती सौ.प्रतिभा धुमाळ, उपसभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर-निंबाळकर, महानंद डेअरी चे उपाध्यक्ष डि के पवार ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलटण शहर अध्यक्ष मिलिंद नेवसे, नगरसेवक व नगरसेविका, पंचायत समिती सदस्य व सदस्या, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गटबाजीविरहित राजकारण करावे लागेल

रामराजे ना. निंबाळकर म्हणाले की,   सर्वसामान्य लोक आहे तिथंच राहत होते . १९९१ ला श्रीमंत शिवाजीराजे यांनी आम्हाला राजकारणात आणले . आम्हाला सांगितले की , हा तालुका तुम्हाला सांभाळावा लागेल . तेव्हा आम्ही ठरवले की , कधीही आम्ही तिघे भाऊ भांडणार नाही . आज रडीचे राजकारण सुरू आहे व विकासाचे राजकारण मागे पडत आहे . आम्ही राजकीय कारकिर्दीमध्ये दूरदृष्टीने विकासाचे राजकारण केले व त्यास जनतेनेही साथ दिली . राजकारण हे जनहितासाठी करायचे असते  तेच आम्ही केले आहे . त्यामुळे आमच्या समोर कोण आहे ? कोण कोणत्या पक्षातून उभे राहतेय याची आम्हाला मुळीच फिकीर नाही " पुढील काळात विकासात्मक राजकारण व युवा पिढीच्या भवितव्यासाठी गटबाजीविरहित राजकारण करावे लागेल . माझ्या कारकिर्दीत मला कितीही विरोध झाला किंवा कुणीही समोर आले , तरी मी ४२ हजारांवर मताधिक्य घेत निवडून गेलोय.

कोणतेही पद मिळण्यासाठी ही निवडणूक लढवायची नाही

कंपनी ही नोकरीसाठी आणायची असते . दूध डेअरी ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर देण्यासाठी काढायची असते , माणचे आमदार हे टीका करतात की काय केले ? दूध डेअरी काढली ती कशी काढली , हे सर्व माहीत आहे . मागील पाच वर्षे ज्यांनी टीका केली ते भाजपात गेलेत . त्यांनी ८० कोटींचे कर्ज कार्यकर्त्यांच्या नावावर घेतले आहे . मला कोणतेही पद मिळण्यासाठी ही निवडणूक लढवायची नाही . परंतु , चुकीच्या प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत आपणास जिंकायची आहे . जिल्हा व तालुका मला सुखरूप ठेवायचा असेल तर आपल्याला चूक करून चालणार नाही . गेली ३० वर्षे अविरत कष्ट केले आहे . काहीजणांना रामराजेंना शिव्या घातल्याशिवाय झोप लागत नाही , हा जिल्हा सुखरूप ठेवायचा असेल तर आपला मतदार संघ सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे . त्यांना पाण्यातलं काही कळत नाही . यांच्या हातात जर हा जिल्हा दिला तर त्यांना एक वर्ष पण ११ तालुके संपवायला लागणार नाहीत , ' अशी भीतीही रामराजे यांनी यावेळी व्यक्त केली .

 कालवा समितीवर तो आमदार कसा ? 

नीरा - उजवा कालवा व त्यामधील पाण्याशी माणचा काडीमात्र संबंध नाही . परंतु , तरीही नीरा - उजवा कालवा समितीवर जयकुमार गोरे यांची स्वराज कारखान्याचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे . तेव्हा या समितीवर दुसऱ्या तालुक्याचा आमदार कसा   अशा प्रवृत्ती येथे आल्याने या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात दहशतीचे वातावरण असून ,  या लोकांच्या दहशतीमुळे येथे काम करण्यास आता अधिकारी व कर्मचारी धजावत नाहीत , अशी टीकाही रामराजे यांनी यावेळी केली .

फलटण तालुक्यास मालोजीराजेंच्या विचारांचा वारसा लाभला आहे

 संजीवराजे निंबाळकर म्हणाले , . " रामराजे हे फक्त फलटण तालुक्याचे नव्हे , तर पश्चिम महाराष्ट्राचे भगीरथ आहेत . रामराजेंवर टीका करतात . त्यांचा पाण्याचा संबंध फक्त कशासाठी येतो , हे जनतेस माहीत आहे . फलटण तालुक्यास मालोजीराजेंच्या विचारांचा वारसा लाभला आहे , हे कोणी विसरून चालणार नाही . आ . दीपक चव्हाणांना ज्या दोन वेळेला मताधिक्य मिळाले त्या पेक्षा जास्त ताकदीने आपला उमेदवार निवडून आला पाहिजे . 

तालुक्यात कुत्र्यांच्या छत्र्या जशा उगवतात तशा नेते उगवतात

संजीवराजे म्हणाले की, ' आपल्या विरोधातील काही चारपाच जणच सोशल मीडियावर टीका करीत असतात . त्यांना उत्तर देताना आपण कमी पडत आहे . गेल्या २५ वर्षात अत्यंत सुरक्षित राजकारण बघितले आहे . रामराजे हे फक्त फलटण तालुक्याचे नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचे भगीरथ आहेत . जे रामराजेंच्या वर टीका करतात त्यांचा पाण्याचा संबंध फक्त कशासाठी येतो , ते पाहणे गरजेचे आहे . विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या . मालोजीराजेंचा वारसा लाभलेला तालुका आहे . निवडणूक आली की कोणीतरी येतो आणि एक कंपनी विकत घेतली आहे आणि त्या कंपनीत ७ हजार मुले कामाला लावणार ? , असा उपरोधिक टोला दिगंबर आगवणे यांचे नाव न घेता लगावला . यामुळे असे लोक तालुक्यात कुत्र्यांच्या छत्र्या जशा उगवतात तशा नेते उगवतात . मागं एवढं भगदाड पडलंय , सगळं सील झालं आहे . आता काय तालुक्याला सील करणार का ? तालुक्यातील काही व्यक्ती लॉटरी लागून झालेले खासदार आहेत . अटीतटीची निवडणूक कधीच नव्हती आणि नाही आम्ही घरं भरण्यासाठी कधीही राजकारण केलं नाही . कुणीही येईल आणि टिकली मारून जाईल , असा हा तालुका नाही . कुणाहा कुठ गलला नाही , आपला ताकद एकत्र ठेवा , आपली ताकद विरोधकांना दाखवून द्या . '

पुढे जशास तसे उत्तर देणार

 राजकारण जर असभ्य वळणारवर जाणार असेल , विरोधक जर मर्यादा सोडून बोलणार असतील , तालुक्याचे वाटोळे करणार असतील तर आम्ही त्यांना जशाच तसे उत्तर देणार आहोत . माझ्या पूर्वजांनी काय माती खाली नाही . इथून पुढे माझ्या मुलाला शिक्षा झाली तरी मी माघार घेणार नाही . आचा माझीसुद्धा मर्यादा संपलेली आहे . तालुक्यातील कुठलाठी लुंग्या सुंग्या उठतो व आमच्यावरती टिका करतो . इथून पुढे आम्ही जशास तसे उत्तर देणार आहोत . कै . चिमणराव कदम , माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर , माजी आमदार हरिभाऊ निंबाळकर यांनीठी राजकारण केले . विरोध केला परंतु मर्यादा कधी सोडल्या नाहीत . त्यामुळे आम्ही इथून पुढे जशास तसे उत्तर देणार आहोत , असा इशाराठी श्रीमंत रघुनाथराजे यांनी यावेळी दिला .

लोकसभेची निवडणूकही नुरा कुस्ती होती 

 रघुनाथराजे म्हणाले , ' काही वर्षांपूर्वी माझ्यावर हिंदुराव नाईक - निंबाळकरांनी ३०७ सारखा गंभीर गुन्हा दाखल केला होता . मी न डगमगता याला सामोरे गेलो . मात्र , यापुढे मी तालुक्याला विश्वजीतराजेंना बहाल करणार असल्याचे सांगितले . कोणतीही परिस्थिती आली तरी रामराजे विश्वजीतला बाहेर काढतील , असा मला विश्वास आहे . यापुढे जशाच तसेच उत्तर दिले जाईल . येणाऱ्या काळात रामराजेंच्या पाठीमागे उभे राहावे , असे आवाहन रघुनाथराजे यांनी केले . खासदारकीची निवडणूक ही नुरा कुस्ती होती . राष्ट्रवादीचा उमेदवार संजय शिंदे परवा रणजितसिंहांबरोबर मुख्यमंत्री यांच्याकडे गेल्याचा गौप्यस्फोट करीत ती लोकसभेची निवडणूकही नुरा कुस्ती होती , असे सांगत रणजितसिंह यांना खुले आव्हान देत द्या खासदारकीचा राजीनामा व संजीवराजे लढतील राष्ट्रवादी काँग्रेसकडून व तुम्ही लढा भाजपाकडून मग बघू , असे सांगितले .

मर्यादा ओलांडू देणार नाही

विकासाची चौकट मोडू देणार नाही कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय ठेयू नका परंतु कोणी नाहक त्रास दिला , कोण आडवा आला तर त्याला सोडू नका ही स्व .श्रीमंत शिवाजीराजे यांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे . कोणालाही मर्यादा ओलांडू देणार तर नाहीच , परंतु विकासाची साधने असलेली जिल्हा बँक , जिल्हा परिषद किंवा अन्य सहकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोडतोड करू देणार नाही असा स्पष्ट इशारा श्रीमंत रघुनाथराजे यांनी यावेळी दिला

युवा वर्गाने राजे गटाच्या मागे उभे रहावे

 विश्वजीतराजे ना . निंबाळकर म्हणाले , ' रामराजेंनी २५ वर्षे घेतलेले कष्ट , या तालुक्यासाठी केलेला त्याग विसरून न जाता तालुका चुकीच्या हातात न देता एकदिलाने , युवा वर्गाने राजे गटाच्या मागे उभे रहावे, विरोधकांना अंगावर घेण्याची वेळ आली तरी सर्वात पुढे आपण असू .फलटण तालुक्यातील सत्ता चुकीच्या माणसांच्या हाती जावू देऊ नका . तालुक्यात कोणीही येईल आणि तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करेल . तुम्ही तुमचा स्वाभिमान विकू नका व कुणालाही घाबरु नका . मी तुमच्या सोबत आहे . तुमच्यासाठी वेळप्रसंगी ठोकाठोकीसुद्धा करणार, तरुणवर्गाच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार आहे . तरुणांनी त्याची बिलकुल काळजी करु नये ; मी तुमच्या सोबत आहे , आता एक महिना फक्त राडा अन धिंगाणा घाला . ' असे खुले आवाहन त्यांनी युवकांना केले .
यावेळी  शुभम नलवडे,  कु . भिडे , कु . काळे , पाडेगावच्या सरपंच सौ . स्मिता खरात , पृथ्वीराज पाटील , रवींद्र फले , अक्षय गायकवाड , ओंकार चोरमले, गौरी जगदाळे , सौरभ चव्हाण , जीवन वाघ , सिद्धेश माने , राजेंद्र तोडकर , माँटी चव्हाण , माधव जमदाडे आदींनी मनोगत व्यक्त केले पराग भोईट यांनी आभार मानले .

Post a Comment

0 Comments