Hot Posts

6/recent/ticker-posts

सातार्‍यात कंत्राटी कामगार चार महिने पगाराविना ठेकेदाराने केले हात वर, पालिकेत नुसती खाबुगिरी


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: पालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोत मजूर ठेकेदाराने नेमलेल्या अनेक कामगारांना तब्बल तीन ते चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. पालिकेकडे पैसे मिळाले नसल्याचे कारण सांगत ठेकेदार हात वर करत असल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळी आली असून याचे पालिकेला कोणतेही ‘सोयर ना सुतक’ अशी अवस्था आहे.
याबाबात माहिती अशी, पालिकेच्या कचरा डेपोतील ओला, सुका कचरा विलगीकरणाच्या ठिकाणी पालिकेच्या मजुर कंत्राटदाराने काही कामगार नेमले आहेत. यामध्ये वॉचमन, कॉम्प्युटर ऑपरेटर अशा कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. ठेकेदाराला वेळेवर पैसे मिळत नसल्याने ठेकेदाराकडून या कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही.
एका ठेकेदाराकडे काम करणार्‍या सुमारे दहा कामगारांना नोव्हेंबर महिन्यापासून पगार मिळालेला नाही. आधीच हे कामगार कंत्राटी असून त्यातही तुटपुंजा पगार असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 1 फेब्रुवारीपासून तर दहापैकी चार कामगारांनी काम सोडून दुसरीकडे काम शोधण्यास सुरुवात केली आहे. या कामगारांमध्ये एका माजी नगरसेवकाचा भाऊही आहे. मात्र, त्याची घरची परिस्थिती जरा बरी असल्याने तो तेथे अजूनही काम करत असल्याचे काही कामगारांनी सांगितले.
या कामगारांच्या पगारामध्ये अनियमितता असून चार महिन्यांपूर्वी काही कामगार उदयनराजेंकडे आपली कैफियत घेऊन गेले होते तेव्हा त्यांना पगार मिळाला. मात्र तेव्हापासून आजपर्यंत पुन्हा पगार झालेला नाही.
कायगुडे म्हणतात येऊ नका
या कामगारांनी आरोग्य अधिकारी कायगुडे यांची भेट घेतली असता ते अरेरावी करत तुम्ही कामावर येऊ नका, असा सल्ला देतात, असे काही कामगारांनी ‘सत्य सह्याद्री’ कार्यालयात येऊन सांगितले.
पालिकेत खाबुगिरी बोकाळली
यासंदर्भात कामगारांनी ठेकेदाराकडे पगाराची मागणी केली असता जोपर्यंत पालिका माझे पैसे देत नाही तोपर्यंत तुमचा पगार मी देऊ शकत नाही, असे सांगत असमर्थता दर्शवली. असल्याचे सांगत काही कर्मचार्‍यांनी पालिकेत खाबुगिरी सुरु असल्याचा थेट आरोप केला. केवळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी संचित धुमाळ सोडले तर पालिकेतील जवळपास सर्वच टेबलला किमान पाच हजार रुपये दिल्याशिवाय सह्याच होत नसल्याचा गंभीर आरोप या कामगारांनी केला. शिवाय आपण याचे प्रत्यक्षदर्शी आहोत, असेही सांगितले. त्यामुळे पालिकेच्या कारभाराबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.
या सार्‍या प्रकाराला मुख्याधिकारी शंकर गोरे यांची साथ आहे की त्यांना याबाबतीत काहीच माहिती नाही, यासाठी त्यांना संपर्क केला असता त्यांनी मोबाइल न उचलल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

Post a Comment

0 Comments