सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
म्हसवड: विद्यार्थ्यांनी शालेय दशेत अभ्यासाबरोबर बाह्य परीक्षा व खेळात मिळवलेले यश हे नक्कीच प्रेरणादायी आहे. या यशाची मिळालेली कौतुकाची थाप ही अविस्मरणीय- असते यामुळेच विद्यार्थी यशाची निखरे एका पाठोपाठ सर करतो. त्यामुळे विद्यार्थ्यानी आभ्यासाला खेळ व व्यायामाची जोड़ देण्याचे आवाहन पत्रकार दीपक तंडेबडवे यांनी केले.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसवड येथे बक्षीस वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे, अध्यक्ष म्हणून स्कूल कमेटी उपाध्यक्ष अॅड. पृथ्वीराज राजेमाने, स्कूल कमेटी सदस्य नितिन दोशी, केंद्रप्रमुख बाळासाहेब, शिवराज राजेमाने, विपुल दोशी, संभाजी माने, प्राचार्य एम. जी. नाळे, उपमुख्याध्यापिका रुक्साना मोकाशी, पर्यवेक्षिका लता शिंदे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. .
विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय वर्षभर विविध स्पर्धा परीक्षा बाह्य परीक्षा उपक्रम राबवित असल्याची माहिती अॅड. राजेमाने यांनी दिली. यावेळी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना विद्यालयाच्यावतीने प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विविधगुण कार्यक्रमामध्ये ‘मी सावित्री बोलतेय, चला जेजुरीला जाऊ, मंगळावरील भारत प्रक्षेपण, अज्ञान, अंधश्रद्धा, दूर करणार्या नाटिका, वृक्षरोपन वृक्षसंवर्धन, देशभक्ती पर अशा सुंदर नाटिका सिद्धनाथ महाविद्यालय विद्यार्थ्यांनी सादर केल्या.
या वेळी सन 18-19 या वर्षी दहावी बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा म्हसवड शहरातील शिक्षण प्रेमी नागरीक व व्यावसायिक बांधवांनी रोख रक्कम व शालेय साहित्य देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतांना उपस्थित रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रास्ताविक प्राचार्य नाळे यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष देशमुख यांनी केले. आभार लता शिंदे यांनी केले.

0 Comments