Hot Posts

6/recent/ticker-posts

सातारा बसस्थानकात पाच शिवशाही बसेस खाक



उमेश चव्हाण

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा:  सातारा बसस्थानकात सेव्हनस्टार शॉपिंग सेंटरच्या बाजूकडे उभ्या असलेल्या शिवशाही बसला आग लागून त्या शेजारी उभ्या असलेल्या पाच बसनाही आग लागली. तासाभरानंतर आग आटोक्यात आणली असली तरी बसेसचे जळून मोठे नुकसान झाले. सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी गाडीतील एका प्रवाशाने पेटते सिगारेट गाडीतच फेकून दिल्यामुळे आग पेटल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिल्याची चर्चा घटनास्थळी होती. 

सायंकाळी साडेचारच्या सुमारास बसस्थानकात येऊन थांबलेल्या शिवशाही बसमधून अचानक धुराचे लोट येऊ लागताच धावपळ सुरु झाली. 

अनेकांनी तातडीने पोलीस स्टेशन तसेच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला फोन केले. मात्र, सुमारे पाऊण तासांनंतरही अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोचू शकली नाही. तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केल्याने त्या बसच्या शेजारी उभ्या असलेल्या अन्य चार बसलाही या आगीची झळ बसली. एक बस पूर्णपणे जळून खाक झाली तर बाकीच्या चार बसेसचे मोठे नुकसान झाले. 

आग लागल्याचे समजताच मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली. गर्दीला आवरता आवरता पोलिसांच्या नाकी नऊ आले. बसस्थानकाच्या कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. अर्ध्या तासांनंतर  अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले तरी बसेस जळून खाक झाल्या होत्या. 

बघ्यांच गर्दी व रस्त्यावरील वाहने थांबल्याने बसस्थानक ते पोवईनाका रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली. अनेक बसेस रस्त्यावरच खोळंबुन उभ्या होत्या. सुमारे दीड ते दोन तासांनी वाहतूक पूर्ववत झाली. या आगीची घटनास्थळी मोठी चर्चा होती. अनेकांनी काढलेले व्हीडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे  काम सुरु होते. 

Post a Comment

0 Comments