Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षक बँकेतील गैरकारभाराची चौकशी सुरू

 


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

पिंपोडे बुद्रुक:   प्राथमिक शिक्षकांची जिव्हाळ्याची असलेली बँक म्हणजे शिक्षक बँक. याच बँकेत नियमबाह्य कर्ज वाटप, अपारदर्शक गैकारभार, व सहकार आयुक्त यांची बंदी असताना ही चाललेला भरमसाठ खर्च याची तात्काळ चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश मा सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयाकडून मा जिल्हा उपनिबंधक सातारा यांना प्राप्त झाले आहेत.

सहकार आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली

कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच सहकारी बँकांनी सर्व प्रकारच्या खर्चात काटकसर करण्याचे आदेश मा सहकार आयुक्त श्री अनिल कवडे यांनी दिनांक 10/06/2020 रोजी दिले होते.

या परिपत्रकानुसार बँकांनी उत्पन्न क्षमता टिकवण्यासाठी सभा - समारंभ, जाहिरातीवरील खर्च, फर्निचर खरेदी व दुरुस्ती, चहापान खर्च, कार्यालय नूतनीकरण इत्यादी प्रकारचा खर्च करता येणार नाही. त्या खर्चावर मर्यादा आणावी, असे स्पष्टपणे सांगितले होते.  परंतु सहकार आयुक्त यांच्या पत्राला ठेंगा दाखवत विद्यमान चेअरमन व सत्ताधारी संचालक यांनी हुकूमशाही पद्धतीने वरील सर्व गोष्टी बँकेत चालूच ठेवल्या. 

या विरोधात बँकेचे भविष्य टिकावे याकरिता शिक्षक समितीचे संचालक किरण यादव, चंद्रकांत मोरे, सुभाष शेवाळे, शिवाजी शिंदे यांनी सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य व जिल्हा उपनिबंधक सातारा यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.

सध्या बँकेत जाहिराती वर खर्च करण्यास बंदी घातलेली असताना ही फक्त स्वतः च्या सवंग लोकप्रियतेसाठी अनेक वर्तमान पत्रे, मासिके, दिवाळी अंक यातून स्वतःचे फोटो सहित जाहिराती दिल्या व बँकेचा विनाठायी खर्च केला. तसेच चहापानावर ही बंदी असताना जेवणावर ताव मारून त्याची बिले बँकेला भरायला सांगितली. आजही कितीतरी हॉटेलची बिले बँकेत व्हावचर फाईल ला पाहायला मिळतील.

शाकाहारी व मांसाहारी जेवण बँकेत मागवून किंवा बाहेर जेवण करून त्याची बिले बँकेत देऊन पैसे घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

याबाबतचे सर्व पुरावे चौकशी समितीला दिल्याने सत्ताधारी चेअरमन व त्यांच्या बगलबच्चे संचालक यांचे पितळ उघडे होणार आहे.

तसेच अनेक शाखांमध्ये सत्ताधारी मंडळींनी दबावाने करायला लावलेली नियमबाह्य कर्ज प्रकरणे, सादर केलेले पगाराचे खोटे दाखले, स्वतः विद्यमान चेअरमन यांनी काढलेले नियमबाह्य कर्ज, सादर केलेला  खोटा पगार दाखला व दस्तऐवज, कर्ज मर्यादेचे केलेले उल्लंघन याचे ही सर्व पुरावे चौकशी समितीला सादर केलेले असल्याने बँकेतील अंतर्गत चाललेले गौडबंगाल चव्हाट्यावर येऊन निःपक्षपाती पणे चौकशीतून सत्य उजेडात येईल.

लवकरच वरील सर्व मुद्द्यांचा स्वयंस्पष्ट अभिप्रायासह वासुस्थिती दर्शक अहवाल सभासद च्या समोर येईल, अशी आशा शिक्षक समितीच्या संचालकांना आहे.

वरील सर्व प्रकारामुळे जिल्ह्यातील सभासद बंधू भगिनी यांच्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे. सत्ताधारी मंडळींच्या तुघलकी कारभारामुळे जिल्ह्यातील गुरुजींच्या मध्ये खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments