अनेक बड्या धेंडांना लाखोंचा गंडा, मोक्का लावण्याची मागणी
विक्रम चोरमले
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण: बिल्डर, व्यापारी तसेच विविध क्षेत्रांतील बड्या मंडळींना व धनिकांना खोट्या प्रेमाच्या मोहजालात अडकवून त्यांची लाखोंची आर्थिक लुबाडणूक करणार्या ‘हनी ट्रॅप’ टोळीचा फलटण तालुक्यात सुळसुळाट सुरू असून या टोळीचा पर्दाफाश वेळेवरच पोलिसांनी करण्याची मागणी लुबाडणूक झालेल्या दुःखी व्यक्तीकडून होत आहे. फलटण तालुक्यातील या हनी ट्रॅप टोळीचे कारनामे जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यापुढे मांडण्यात येणार असून या हनी ट्रॅप टोळीस मोक्का ट्रॅप मध्ये अडकवून कायद्याची ताकद दाखवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
फलटण तालुक्यात कमी श्रमात जादा पैसा मिळवून देणारा हनी ट्रॅप चा धंदा चांगलाच जोर धरू लागला आहे. तालुक्यातील बकरे गटविण्याचे टोळीचे मनसुबे सुरू असून , त्यादृष्टीने लॉकडाऊन उठल्यानंतर प्लॅनिंगप्रमाणे या टोळीची जोरदार बेटिंग सुरू झाली आहे. यामध्ये अब्रु वाचवण्याच्या पायात अनेकांच्या चांगल्याच आर्थिक विकेटा पडल्या असल्याची खात्रीशीर माहिती आहे. विनाकष्ट झटपट पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी नको त्या मार्गाला तरुण पिढी लागली असून सहज पैशासाठी हनी ट्रॅप चा धंदा सुरू केला आहे.
असा केला जातो प्लॅन
मोकाट तरुणांनी हा धंदा कसा सुरू केला याबाबत आम्ही घेतलेली महिती अशी की, हनी ट्रॅप टोळीतील सदस्य प्रथम एका लैलेला तयार करतात ही लैला तिच्या ठरलेल्या हिस्याच्या पैशासाठी हवे ते करायला तयार होते नंतर या टोळीतील अनेक सदस्य म्हणजेच स्वतःला भाई समजणारी मोकाट तरुण पिढी एक सावज शिकार शोधतात, जेणेकरून सहजतेने हा पूर्ण कार्यक्रम विना विघ्न पार पडावा
प्रथमतः आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीची संपूर्ण माहिती घेऊन दैनंदिन येण्या जाण्याची माहिती घेऊन या टोळीकडून प्लॅन तयार केला जातो. ठरल्याप्रमाणे दुकान अथवा ऑफिस याचबरोबर हॉटेल याठिकाणी त्या लैलेला ज्याला ट्रॅपमध्ये ओढायचा आहे, त्या व्यक्तीकडे पाठवले जाते यानंतर ओळख काढून तसेच काही काम आहे असे भासवून याव्यतिरिक्त अनेक कारणाने त्या व्यक्तींचा मोबाईल नंबर घेऊन या ट्रॅपची सुरुवात होते.
मोबाईल नंबर मिळाल्यानंतर हाय, हॉलो, गुड मॉर्निंग, गुड नाईट अशा मेसेजने लैलाकडून संपर्क साधला जातो. पुढूनच पावले पुढे पडत असल्याने अलगदपणे मेसेजेसला प्रतिक्रिया दिली जाते आणि अलगदपणे या टोळीकडून पहिला टप्पा गाठला जातो. असाच संवाद साधत साधत पुढील टप्यात कोणत्याही एका हॉटेलमध्ये अथवा एकांतात हे युगुल भेटायला येतात आणि नंतर लॉजपर्यत हा प्रवासचा सुरू होतो.
लाखोंची मागणी हजारातही तोड
ठरल्याप्रमाणे लॉजमध्ये एकांतात नको त्या गोष्टी घडतात कधी कधी गुपचूपपणे छायाचित्रण केले जाते. काही तासांच्या नंतर हे युगल लॉजच्या बाहेर पडताच दबा धरून बसलेले या टोळीतील सदस्य लैलेचे भाऊ म्हणून अथवा पती म्हणून पुढे येतात यानंतर बळीचा बकरा झालेल्या व्यक्तीला धमक्या देऊन मारहाण करून चांगलीच भीती दाखवली जाते. यानंतर पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली जाते यानंतर नको त्या भानगडीत पडण्याची भीतीपोटी जागेवरच विषय संपवण्यासाठी टोळी सदस्य पैशाची मागणी करतात. बदनामी व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईल या भीतीने फसलेल्या व्यक्तीकडून पैसे देण्याची तयारी झाल्यावर लाखोंच्या पटीत मागणी सुरू होते ती कधी कधी हजारात पण येऊन पोहोचते. यानंतर रोख रक्कम वसूल करून बाहेर कोठेही वाच्यता न करण्याच्या अटीवर हा कार्यक्रम संपतो आणि मिळालेल्या पैशाची ठरल्याप्रमाणे ‘हनी ट्रॅप‘ टोळीच्या सदस्यांची टक्केवारी नुसार वाटणी होते आणि पुन्हा एकदा नव्याने दुसर्या बकर्याची शोध मोहीम सुरू होते.
एसपी साहेब या बोक्याच्या मुसक्या आवळाच
अनेक दिवसांपासून सुसाट वेगाने हनी ट्रँप च्या माध्यमातून तालुक्यात पैसे लाटणारी या टोळीने अनेकांना चांगलेच आर्थिक दरीत लोटले असून अनेक जण प्रतीक्षेत असून या टोळीच्या बोक्यासह लैला व ईतर सदस्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत असून या हनी ट्रॅप टोळीस मोक्का ट्रॅप मध्ये कायमचे अडकवून कायद्याचा हिसका दाखवाच, अशी मागणी होत आहे
(क्रमश:)

0 Comments