Ticker

6/recent/ticker-posts

बाळू खंदारे प्रकरणावरून उदयनराजे यांचा शिवेंद्रसिंहराजेंवर निशाणा

सातारा : साताऱ्यात दहशत माजविणारे निवडून आणायचे आणि त्यांच्या दहशतीचा निवडणुकीच्या वेळी सोयीस्कर उपयोग करायचा, यांचे पाठीराखे कोण आहेत हे सातारकरांना ठाऊक आहे असा राजकीय निशाणा खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर नाव न घेता साधला. बेकायदा शस्त्र बाळगणे या सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी जामीनांवर बाहेर येऊ लागले तर उद्रेक होईल या प्रकरणांची उच्च न्यायालयांच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली.

उदयनराजे भोसले यांनी शनिवारी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. बाळू खंदारे प्रकरणातील पोलिसांच्या ताब्यातील काही जणांची न्यायालयाच्या आदेशानंतर जामीनावर सुटका झाली. या प्रकरणाच्या संदर्भाने खासदारांनी गांभीर्याने आपली मते हिरिरीने मांडली.

उदयनराजे पुढे म्हणाले, खूनाचा प्रयत्‍न आणि जबरी चोरीचा गुन्‍हा दाखल असणारा नविआचा नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे हा पोलिसांना सापडत नाही. त्‍याचे अटकेत असणारे साथीदार कायद्यातील त्रुटी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करुन जामीनावर सुटले आहेत. जामीनपत्रावरील आदेशात न्‍यायालयाने काही बाबी नोंदवल्‍या असून त्‍या गंभीर आहेत. या नोंदींचा न्‍यायालयाने फेरविचार करणे आवश्‍‍यक आहे.


नागरीक म्‍हणून मी मत मांडतोय. काही प्रकरणांत पोलिस यंत्रणा लोकप्रतिनिधींच्‍या दबावाखाली काम करते. यामुळे अन्‍यायग्रस्‍ताला पोलिसांकडून न्‍याय मिळत नाही. दबावातील पोलिसनंतर सांगतोय तशीच तक्रार दे, हे नाव घेवू नको, असे फिर्यादीस सांगतात. कशासाठी हे सगळे? साताऱ्यातील गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलिस अधिकारी, सरकारी वकील तसेच न्‍यायव्‍यवस्‍थेत सहभागी असणाऱ्या प्रत्‍येकाने आपण समाज घटक असल्‍याचे विसरु नये. आज कुणावर तरी हल्‍ला झाला, उद्या दुसऱ्यावर होईल, परवा तुमच्‍यावर होवू शकतो. मग त्‍यावेळी तुम्‍ही कोठे जाणार. गंभीर गुन्‍ह्यातील संशयितांना जामीन मिळवून देण्‍यासाठी न्‍यायालयाची दिशाभुल केली जातेय. यात पोलिस अधिकारी, सरकारी वकील आणि लोकप्रतिनिधींची मिलीभगत आहे.


हा आरोप मी नागरीक म्‍हणून करतोय. गंभीर गुन्‍हा दाखल असणारा खंदारे पोलिसांना सापडत नाही. दहशत माजविणाऱ्याला तिकीट द्यायचे, निवडून आणायचे आणि त्‍याच्‍या दहशतीचा वापर स्‍वत:च्‍या निवडणुकीवेळी करायचा. कोण देत त्‍याला तिकिट, कोण निवडून आणते. त्‍याचा पाठीराखा कोण हे सगळ्या सातारकरांना माहित आहे. काही संशयितांच्‍या जामीन आदेशात काही नोंदी आहेत. त्‍या नोंदी गंभीर असून त्‍या जामीन आदेशाचा वापर राज्‍यातील नव्‍हे तर देशातील सराईत गुन्‍हेगार जामीन मिळवण्‍यासाठी करतील. असे गुंड जामीनावर बाहेर आले तर देशात, राज्‍यात मोठा उद्रेक होईल. जामीन पत्रातील नोंदीचा फेरविचार होणे आवश्‍‍यक आहे. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्‍ठ न्‍यायालयाने करणे आवश्‍‍यक असून त्‍यासाठी न्‍यायमुर्तींनी हस्‍तक्षेप करणे आवश्‍‍यक असल्‍याचे मतही त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.

Post a Comment

0 Comments