गणेशोत्सव बैठकीत केल्या सूचना मूर्तिच्या उंचीवर निर्बंध नाहीत
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले : माण तालुक्यातील सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी आज दहीवडी परिसरातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व पोलीस पाटील यांची दहिवडी पोलीस स्टेशनच्या वतीने माऊली मंगल कार्यालय या ठिकाणी दहिवडी विभागाचे उप. अधीक्षक डॉ. निलेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. देशमुख म्हणाले की, येणाऱ्या गणेशोत्सव काळामध्ये तालुक्यातील सर्व गणेश मंडळांनी शासनाच्या सूचनाचे व नियमाचे पालन करून गणेशोत्सव साजरा करायचा आहे. तसेच गणेशोत्सव साजरा करत असताना मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पोलीस विभागाकडून गणेशोत्सवासाठी लागणारी ऑनलाईन नोंदणी करून परवानगी घ्यावी. तसेच गणेशोत्सव मंडळाने डी.जे.व डॉल्बीचा वापर करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.अशा कडक सूचना दिल्या..
दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी पोलीस पाटील व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष यांना सूचना करताना म्हणाले की. कोरोना काळामध्ये जे नियम होते ते नियम जसेच्या तसे आहेत. डॉल्बी लावण्यास पूर्णपणे बंदी आहे, आयोजीत कार्यक्रमांमध्ये कोणाच्या भावना दुखवल्या जातील असे कोणतेही वक्तव्य करायचे नाही. गणेशाची मूर्ती ज्या ठिकाणी बसविली जाणार आहे त्या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये याची जबाबदारी घ्यावी. गणेशोत्सव काळामध्ये जे कोणी अफवा पसरवत असतील अशा लोकांची नावे पोलिस स्टेशनला कळवावी तुमचे नाव एक गुपित ठेवले जाईल. असे आव्हान केले
महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेश डावरे म्हणाले की गणेशोत्सवासाठी गणेश मंडळाने वीज पुरवठा कनेक्शन मागणी करावी ती त्वरित जोडून देण्यात येईल. काही गणेश मंडळे विजेच्या तारेवर चोरून आकडा टाकून कनेक्शन घेतात. त्यामुळे वीरचोरीचा प्रश्न निर्माण होतो किंवा शेजारील घरातून वीज पुरवठा घेतात त्यामुळे घरातील मीटर वर लोड येऊन शॉर्टसर्किट होऊन आग लागते. त्यामुळे अनेक अनेक वेळा जीवघेणे प्रकार झाले आहेत असे प्रकार घडू नये म्हणून मागेल त्याला कनेक्शन मिळेल अशी सूचना केली..
यावेळी नायब तहसीलदार अकुश इवरे, महा. वितरणचे राजेश डावरे, रणजित देशमुख, जि.वि.शा.अधिकारी संदीप खाडे, गोपनीय विभागाचे प्रकाश इंदलकर, पोलीस पाटील संघटनेचे अप्पासाहेब गायकवाड,पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments