सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा:
आपले आई-वडील आपल्यापेक्षा भावाला चांगले म्हणतात, या रागातून एका नराधमाने आपल्या सख्ख्या तान्हुल्या पुतण्याला विहिरीत फेकले. बाळाच्या मृत्युनंतर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला., शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. शलमोल मयुर सोनवणे असे विहिरीत टाकलेल्या 10 महिन्याचे बाळाचे नाव असून अक्षय मारुती सोनवणे (रा. दत्तनगर कोडोली) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर- कोडोलीत दहा महिन्याचे बाळ विहीरीत मृत अवस्थेत तरंगत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. विहीरीत सापडलेले बाळ हे मयूर मारूती सोनवणे (रा. दत्तनगर- कोडोली, ता. जि. सातारा) यांचे आहे.
या प्रकरणाची पोलिसांनी माहिती घेतली असता, मयूर सोनवणे याचा सख्खा भाऊ अक्षय सोनवणे या संशयित आरोपीने बाळाला चॉकलेट देतो, असे सांगून घरातून घेऊन आला होता. त्यानंतर त्याने त्या बाळाला विहीरीत टाकून त्याचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
संशयित अक्षय सोनवणे याला त्याचे आई- वडील त्रास देतात, तर भावाला चांगले म्हणातात. या कारणावरून भावाच्या मुलाला विहीरीत टाकून खून केला. पोलिसांनी बाळाला विहीरीतून बाहेर काढून सातारा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेले आहे. मयत बाळाचे वडील मयूर सोनवणे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी अक्षयला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

0 Comments