सातारा: बनावट प्रतिज्ञापत्र करुन मायणी येथील मागासवर्गीय कुटुंबाची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरेंच्या जामीनावर गुरुवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजुंकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. आता न्यायालय याप्रकरणी शुक्रवारी आपला निर्णय देणार आहे.
गुरुवारी सकाळी. व दुपारी न्या. सालकुटे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील अॅड. नितीन मुके यांनी अद्यापही तपास पूर्ण झालेला नसून दोन आरोपी अटक झालेले नाहीत त्यामुळे पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली. फिर्यादीकडून अॅड. शरदचंद्र भोसले तर आमदार गोरेंच्यावतीने अॅड. हर्षल निंबाळकर यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजुंचे युक्तीवाद ऐकून न्या. सालकुटे यांनी शुक्रवारी याबाबतचा निर्णय दिला जाईल, असे जाहीर केले. गेल्या आठवड्यात गोरे सातारा न्यायालयात शरण आले होते. तेव्हा 25 हजारांच्या जातमुचलक्यावर आमदार गोरे यांना न्यायालयाने अंतरिम जामीन दिला होता. त्यांच्या मुख्य जामिनावर सुनावणी सुरु असेपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण होते. त्यामुळे शुक्रवारी न्यायालय त्यांना जामीन देणार की अटकेचे आदेश देणार याकडे लक्ष आहे.
सही आमदार गोरेंची अन् अंगठे घुटुगडेचे: महादेव भिसे
मायणीतील पिराजी भिसे यांच्या नावे खोटे दस्तऐवज तयार करून त्यांच्या जमिनीचे खोटे प्रतिज्ञापत्र केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या गुन्ह्यात नव्याने आलेले तपासी अधिकारी कोरेगावचे डीवायएसपी गणेश केंद्रे यांचे कडून पक्षपातीपणा केला जात असल्याचा आरोप या प्रकरणातील फिर्यादी महादेव भिसे यांनी केला आहे.
ते पत्रकात म्हणतात फॉरेन्सिक डिपार्टमेंटने त्या डॉक्युमेंट वरील सही ही आमदार गोरे यांचीच असल्याचे म्हटले आहे. मात्र, आमदार गोरे यांच्या नावापुढे उठवलेला अंगठा त्यांचा नसल्याचे म्हटले आहे. परंतु, तो अंगठा जयकुमार गोरेंचा नसला तरी याच गुन्ह्यातील सहआरोपी असलेल्या दत्तात्रय घुटुगडे याचा असल्याचे अहवालात म्हटले आहे. असे असतानाही डीवायएसपी किंद्रे यांनी न्यायालयाच्या समोर केवळ सहीचा मुद्दा उपस्थित केला आणि आंगठा घुटूगडेचा असल्याबाबत बोलणे टाळून एकप्रकारे न्यायालयाची दिशाभूल केली आहे. एकंदरीत किंद्रे यांचे वागणे पाहता ते आरोपींना मदत करण्यासाठीच असल्याचे दिसून येत आहे. याबाबत आम्ही न्यायालयाकडे दाद मागणार आहोत. न्यायालयाने गोरेंना तात्पुरता जामीन देताना रोज पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. तरी त्यांनी हजेरी लावली नाही,तरी किंद्रे त्याबाबत काहीच करण्यास तयार नाहीत. किंद्रे यांनी कितीही पक्षपातीपणा केला तरी त्याचा उपयोग होणार नाही. किंद्रे यांच्याविरोधातही लढत राहू.

0 Comments