सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण: जीएसटी कार्यालयामध्ये विविध पदांवर लावतो, असे सांगून बनावट नेमणूकपत्र आणि प्रशिक्षण देऊन तब्बल 116 जणांची सुमारे 43 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील तिघांचा समावेश असून यात एकूण 7 जण संशयित आरोपी आहेत. ही फसवणूक उघड झाल्यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी तालुक्यात असाच अनेकांची फसवणूक करणारा सैन्य भरती घोटाळा झाला होता. या घोटाळ्याच्या आठवणी या गुन्ह्यामुळे ताज्या झाल्या. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत नितीश पोपटराव भोसले (वय 28, रा. नीलकमल अपार्टमेंट, संजीवराजेनगर, फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून मारुती गुलाबराव मोहिते (रा. राजाळे, ता. फलटण), रवी अंकुश वनवे (रा. मलठण, संतोषीमातानगर), कैलास भारत दोशी (लक्ष्मीनगर फलटण, चंद्रजित अनिल पाटील, रा. कुंडलापूर, ता. कवठेमहांकाळ, संदेश लोटलीकर मुंबई, नितीन चतुर्वेदी, सचिन चतुर्वेदी (दोघे रा. मथुरा, उत्तरप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
मलठण येथील संतोषीमातानगर फलटण व माळजाई मंदिर परिसर फलटण येथे ही घटना घडली असून संशयितांनी संगनमत करुन फिर्यादी भोसले यांच्याप्रमाणे 116 मुलांना जीएसटी कार्यालयात विविध पदावर नोकरी लावतो, असे सांगून त्यांना खोटी बनावट प्रशिक्षणाचे पत्र दिले. त्यावर बनावट शिक्के मारून सह्या करून ती खरे आहे, असे भासवून युवकांचा विश्वास संपादन केला.
शिवाय या तरुणांना खोटे प्रशिक्षणही दिले. यासाठी नितीश भोसले यांच्याकडून 1 लाख 90 हजार रुपये रोख स्वरुपात तसेच इतर 115 जणांकडून 40 लाख 83 हजार रुपये अशी एकूण 42 लाख 73 हजार 500 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दि. 10 सप्टेंबर 2017 ते 31 मे 2022 या कालावधीत ही फसवणूक घडल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Saturday, September 3, 2022
Home
ग्रामीण
खोटे पत्र, खोटे प्रशिक्षण देऊन सुमारे 43 लाखांची फसवणूक, फलटण तालुक्यातील तिघांसह सातजणांवर गुन्हा
खोटे पत्र, खोटे प्रशिक्षण देऊन सुमारे 43 लाखांची फसवणूक, फलटण तालुक्यातील तिघांसह सातजणांवर गुन्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment