वडूजच्या डॉक्टर युवकाचा दुर्दैवी अंत - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, September 3, 2022

वडूजच्या डॉक्टर युवकाचा दुर्दैवी अंत


 धोंडेवाडीनजीक चारचाकी झाडावर आदळली
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वडूज:  खटाव तालुक्यातील धोंडेवाडी गावच्या हद्दीत भिगवण-मिरज  राज्यमार्गावर  चारचाकी  ओढ्यातील झाडावर आदळल्याने  वडूजच्या युवा डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला.  शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात घडला. डॉ. प्रसन्न किशोर भंडारे (वय 35, रा, वडूज, ता. खटाव) असे मृताचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून  व  पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. प्रसन्न हे मायणी येथील  रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल या मेडीकल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्यरत होते. सकाळी मायणीहून परत वडूजला येताना  धोंडेवाडी गावच्या हद्दीत विठ्ठल थोरात यांच्या मालकीच्या  शेतानजीक असणार्‍या एका ओढ्यात डॉ. भंडारे यांची  चारचाकी ( एम.एच. 11 बी.व्ही. 9074) गेली. ओढ्याला  लागूनच असलेल्या एका बाभळीच्या झाडावर जोरात आदळली. त्यामध्ये चारचाकीचे मोठ्या प्रमाणावर  नुकसान होऊन वाहनाचा पूर्णत: चेंदामेंदा झाला.
अपघातात डॉ. भंडारे यांच्या छाती, बरगड्या व हृदयाला  गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या आवाजाने नजीकच्या काही नागरिकांनी   घटनास्थळाकडे धाव घेऊन ओढ्यातील बाभळीच्या  झाडावर आदळून पलटी झालेली चारचाकी पुन्हा उभी  करून डॉ. भंडारे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र  गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.  त्यांच्यासमवेत असणार्‍या आधारकार्डवरील पत्त्यामुळे  नागरिकांनी येथे संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. घटनास्थळी मेडिकल कॉलेजचे पदाधिकारी, कर्मचारी   पोलीस व नागरिकांनी धाव घेतली.  
तर झाडावरील एक फांदीही तुटली होती.  चारचाकीचा पुढील, मागील भाग, इंजिन, चाके, टफ,  दरवाजे अश्या सर्वच भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान  झाले होते. त्यामुळे अपघाताची भिषणता जाणवत होती. 


डॉ. प्रसन्न यांच्यामागे आई-  वडील, एक बंधू, पत्नी, एक मुलगी असा  परिवार आहे. डॉ. प्रसन्न यांचे येथील ग्रामीण  रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
सायंकाळी  शोकाकूल वातावणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या  निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत  मायणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान चारचाकीच्या धडकेने बाभळीच्या झाडातील  बुंध्यातील आतील भाग मोठ्या प्रमाणावर उघडा पडला होता.

अनेक वैद्यकीय संस्थांचे सक्रीय सदस्य

मृत डॉ. प्रसन्न हे येथील प्रख्यात आयुर्वेदतज्ज्ञ व माऊली  आयुर्वेद व पंचकर्म सेंटरचे संचालक डॉ. किशोर भंडारे यांचे पुत्र होते. डॉ. प्रसन्न यांनी आयुर्वेदातील  एम.डी.चे शिक्षण पूर्ण केले असून ते वैद्यकीय व्यवसायाबरोबरच मायणी येथे आयुर्वेद महाविद्यालयात  अध्यापनास जात होते. ते वडूज मेडीकल असोसिएशन व निमा या वैद्यकीय संस्थांचे सक्रीय सदस्य होते.

No comments:

Post a Comment