दुचाकींची समोरासमोर धडक, तरूण जागीच ठार - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, September 19, 2022

दुचाकींची समोरासमोर धडक, तरूण जागीच ठार

वार्ताहर;शुभम गुरव, आसनगांव
-----------------------------
पिंपोडे बुद्रुक येथे आज दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तेजा रमेश भोसले (वय ४०, रा, तरडगाव, ता.फलटण) हा तरुण जागीच ठार झाला. वाठार-सोळशी रस्त्यावर येथील छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेनजीक आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दत्तात्रय चंद्रशेखर नेवसे (वय २३, रा.करंजखोप, ता.कोरेगाव) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज पिंपोडे बुद्रुकचा आठवडा बाजार होता. वर्दळीच्या वेळी चार वाजण्याच्या सुमारास हिरो स्प्लेंडर दुचाकी (क्र.एम.एच.११ सी.एम.२७४७) वरून दत्तात्रय पिंपोडेकडून करंजखोपला निघाला होता. त्याचवेळी समोरून नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून येत असलेल्या तेजा व दत्तात्रय यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की तेजा दुचाकीवरून हवेत उडाला. जोराने डांबरावर आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रयवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी सातारा येथे हलवण्यात आले. शवविच्छेदन करून तेजाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघाताची नोंद वाठार पोलीस ठाण्यात झाली आहे.

No comments:

Post a Comment