गोपूज येथे शॉर्टसर्किटमुळे एक एकर ऊस जळाला - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, January 6, 2025

गोपूज येथे शॉर्टसर्किटमुळे एक एकर ऊस जळाला

 

फोटो: शॉर्टसर्किटने रविवारी लागलेल्या आगीत गोपूज येथील जळालेला ऊस.
सत्यसह्याद्री
औंध प्रतिनिधी
 मौजे गोपूज, ता. खटाव येथे शेरी नावाच्या शिवारात असणाऱ्या मनीषा घार्गे यांच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीवर स्पार्किंग झाल्यामुळे जवळपास एक एकरातील ऊस जळाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की, गोपुज येथील मनीषा दत्तात्रय घार्गे यांनी त्यांच्या शेतात एक एकरमध्ये ऊसाची लागण केली होती. त्या शेतावरून शेतीवाहिनीची विद्युत वाहिका गेली आहे. रविवार दि. 5 जानेवारी 2025 रोजी दुपारी दोन वाजणेच्या सुमारास सदर शेतीवाहिनीच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन उसामध्ये ठिणग्या पडल्या आणि ऊसामध्ये आग भडकली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आग लागल्याचे समजताच तेथील शेतकऱ्यांनी त्वरित आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, मात्र आग प्रचंड होती आणि ती आटोक्यात येणार नाही हे लक्षात आल्याने ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड कारखान्याचा अग्निशामक बंब बोलविण्यात आला. अग्निशामक बंब घटनास्थळी येईपर्यंत ऊस पूर्णपणे जळून खाक झाला होता. सदर घटनेत मनीषा घार्गे यांचे अंदाजे सव्वा ते दीड लाखाचे नुकसान झाल्याचे उपस्थित शेतकरी सांगत होते. सदर घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.


No comments:

Post a Comment