विशाल माने
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
देवापूर: लातूर - सातारा महामार्गावरील म्हसवड ते दहिवडी दरम्यानच्या रस्त्यावर दैनंदिन लहान मोठ्या अपघातांची मालिका सुरूच असताना यावर तालुक्यासह म्हसवड मधील पुढारी बोलेनात अन् अधिकारी हलेनात अशीच दुर्दैवी अवस्था होऊन बसली आहे.
म्हसवड शेजारील माणगंगा नदीवरील पंत वस्ती जवळील रस्ता, करंज ओढ्यावरील पूल, दिवड गावच्या हद्दीतील रस्त्याचा काही भाग, मणकर्णवाडी,पळशी हद्दीतील नियोजीत टोल नाक्याचा भाग, गोंदवले जवळील ओढ्यावरील अपूर्ण अवस्थेतील पुल, गोंदवले गावातील रस्ता तसेच मायणी चॊकाजवळील एस् टाईप वळण या भागाचे काम पूर्ण होणे बाकी आहे. या एस् टाईप वळणावर अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत.
म्हसवड जवळील पुलावर तर साईडला पत्रा लावून ठेवला आहे. रात्रीच्या वेळी हा दुभाजक लक्षात न आल्याने या ठिकाणी अपघात होत असतात.
माणगंगा नदीवरील पूल ते म्हसवड शहर दरम्यानच्या रस्त्यावर काम व्यवस्थित न केल्याने खड्यांचे जाळे झाले आहे. त्याच बरोबर तीर्थक्षेत्र व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हसवड शहराची लाज रस्त्यांमुळे चव्हाट्यावर आली आहे. शहर व शहराबाहेरील सर्व रस्ते पूर्णत: उखडले असून त्यातून प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. फूट-फूट खोल खड्ड्यातून मार्ग क्रमन करताना अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे लोकप्रतिनिधी आणि खुद्द नागरिकही याबाबत प्रचंड उदासीन आहेत. सद्य स्थितीत यात्रेच्या अनुषंगाने अतिक्रमण हटाव मोहिम राबवली जात असली तर ती तात्पुरती का? कायमची? यात्रा संपल्यानंतर ये रे माझ्या मागल्या हे दिवस येऊ नयेत अशी अपेक्षा जाणकार व्यक्त करत आहेत.
रस्त्याला जागोजागी खड्डे पडल्याने शहरातून जाण्या-येण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनचालकांसह वाहनांचे आयुष्यही धोक्यात आले आहे. म्हसवड स्टँड ते चांदनी चौक ते शिक्षक कॉलनी रस्त्याकडे प्रशासनाचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. त्यात शहराच्या बाहेरून जाणाºया जड वाहनांमुळे फूट-फूट खोल खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे. .
दुरवस्था झालेले रस्ते हे म्हसवड नगरपरिषदेच्या विकासाचे द्योतक आहे का? असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे म्हसवड शहराचा विकास खुंटला आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. सिद्धनाथ नगरी बरोबरच अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या शिंगणापूर रस्त्याची तर बिकट अवस्था आहे.
सिद्धनाथ यात्रेच्या निमित्ताने तात्पुरती डागडुजी जन सामन्यांच्या मनातील खदखद दूर करणार का? हाच यक्ष प्रश्न आहे.
धुळीने माखलेले रस्ते आणि अस्वच्छता . तीर्थक्षेत्र असलेल्या म्हसवड ची प्रतिमा मलीन होत आहे.''याचे भान ना राज्यकर्त्यांना ना व्यवस्थेला, टॅक्स भरूनही असल जिण आमच्या नशिबी का? असा संतप्त सवाल म्हसवड कर उपास्थित करतं आहेत.
अतिक्रमण हटाव मग रस्ते
म्हसवड शहरातील अंतर्गत रस्त्यांसंदर्भात दैनिक सत्य सह्याद्रीच्या प्रतिनिधी ने म्हसवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन माने यांच्याशी संपर्क साधला असता सद्यस्थितीत अतिक्रमण हटाव मोहीम राबवत असून तदनंतर शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली
लोकप्रतिनिधी हट्टाव मान खटाव बचाव
ReplyDelete