सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
औंध: राज्यात हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा जोर राहणार आहे.
औंध व परिसरामध्ये देखील गुरुवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढवली आहे. सुगीचे दिवस अजून पूर्ण झाले नसल्याने ह्या पावसाचा त्यावर परिणाम झाला आहे. औंध व आसपासच्या परिसरामधे ज्वारीचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. सध्या बर्याचश्या शेतकऱ्यांनी ज्वारी काढली आहे, काहींची अजून काढणी चालू आहे तर अजून कित्येक शेतकऱ्यांच्या ज्वारीची काटणी झाली नसल्याने हा पाऊस ज्वारीच्या पिकासाठी नुकसानकारक ठरणार आहे. गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने औंध सह परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मेहनतीने कष्ट करून, घाम गाळून, हातातोंडाला आलेले पीक डोळ्यासमोर जमीनदोस्त होताना पाहणे हे फक्त शेतकरीच सहन करू शकतो.
दरवर्षी शेतकऱ्याला अशा आस्मानी संकटाचा सामना करावा लागतो, मात्र तरीही शेतकरी निमूटपणे हे सहन करून पुढच्या मेहनती मशागतीला लागतो, म्हणूनच शेतकऱ्याचा उल्लेख बळीराजा असा केला जातो. सरकारने लवकरात लवकर संबंधित विभागाला नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ करावी अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
0 Comments