सुनील धनावडे
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मेढा: राजकारणात चढ उतार येतात. राजकारणात गडबड करायची नसती. श्रद्धा आणि सबुरीहीही हवी. शिवाय एकमेकाच्या पायात पाय घालू नका, कोणीही ताम्रपट घेऊन आलेलं नाही. असा हल्लाबोल करत इंदिरा गांधींनाही जनतेनं पराभूत केलं हाच चमत्कार करणारी जनता आपल्या देशात आहे तसंच जावलीकर नेतेमंडळी एकत्र राहिलात तर सातारा-जावलीत चमत्कार घडेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केला.
मेढा येथे युवा नेते अमित कदम यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बाळसाहेब पाटील, मकरंद पाटील, दीपक पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उस्थित होते.
पवार म्हणाले, कोणत्याही समाजाला वंचित ठेवण्याचं काम राष्ट्रवादीनं केलेलं नाही, सर्वांना पुढं घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादी पक्षानं केलं आहे. हा अमितचा पक्षप्रवेश मी समजत नाही. तो आपल्यातलाच सहकारी. काही वर्षांपूर्वी बाजूला गेलेला. ज्यावेळेस भेटायचो त्यावेळेस आपलेपणाची भावना त्याच्या व माझ्या मनात असायची. अमित हा राष्ट्रवादीचा घरचाच माणूस असून त्याच्या येण्यामुळे कार्यकर्त्यांना पदाधिकार्यांना आनंद झाला पाहिजे. हा आनंद त्याने सार्थकी लावावा. त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली पाहिजे, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.
अजित पवार पुढे म्हणाले, राजकीय स्थित्यंतरं घडतात पण, आपलं, परिसराचं भलं कशात आहे, हे ओळखलं पाहिजे. सातारा जिह्यानं पवार साहेबांना भरभरुन दिलं. भक्कम साथ दिली. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर निस्सिम प्रेम दिलं. हा बालेकिल्ला भक्कम, अभेद्य ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. 9 आमदार निवडून दिलेला हा जिल्हा आता 1 खासदार आणि तीनच आमदारांवर आलेला आहे. पाडापाडी का होते, कोण कोणाची जिरवतं याचा विचार केला पाहिजे. दीपक पवार म्हणाले, शिवेंद्रराजेंना निधी दिला. पण, मी तुमच्याकडं बघून निधी दिल्याचं पवार म्हणाले,
उसाची काळजी करू नका
सत्तेत असताना जिल्ह्यात पर्यटन वाढावा, रोजगार वाढावा यासाठी भरपूर निधी दिला. मेडिकल कॉलेज दिलं, महाबळेश्वर बाजारपेठेसाठी निधी दिला. तुमच्या उसाची काळजी करू नका, तुमचा ज्या कारखान्याला ऊस जातोय, त्यापेक्षा जास्त भाव देईल, अशा कारखान्याला तुमचा ऊस नेण्याचा प्रयत्न करु, कितीही कोणी मोठ्या बापाचा असला तरी काळजी करू नका आणि कोणावाचून कोणाचं काही अडत नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवेंद्रराजेंवरही निशाना साधला.
खिल्ली, टोले अन् समाचार
अयोध्येला जावा पण शेतकर्यांच नुकसान होऊ नये आणि राज्यावर अशा प्रकारचं संकट येऊ नये साठी प्रार्थना करा, असा सल्ला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना देतानाच दादांनी पुन्हा एकदा वृत्तवाहिन्यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, कालपासून बघतोय आता गाडी निघाली, बस निघाली, रेल्वे निघाली, विमान उडालं, आरं उडूदे काय उडायचंय माझ्या शेतकर्याचं बघ ना. शेतकरी उद्ध्वस्त झालाय. त्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्या त्याचं दाखवा ना, असं ते म्हणाले.
महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. यशवंतराव, वसंतदादा, वसंत नाईक, शरद पवारांनी दाखवलेल्या रस्त्याने जावा. कोणाला तर माईक हातामध्ये आला तर काय बोलायचं कळत नाही. कोण फडतूस म्हणतं, कोण काडतूस म्हणतं अशा शब्दांत त्यांनी फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. वसंतराव मानकुमरे यांनी अमित कदम यांच्या उंचीवरून केलेल्या टीकेचाही अजित पवार यांनी मूर्ती लहान पण, कीर्ती महान अशा शब्दांत समाचार घेतला. ते वाचाळवीर आहेत, केवळ टाळ्या मिळवण्यासाठी त्यांचे उपद्व्याप सुरु आहेत, त्याकडे लक्ष देऊ नका, असे दादांनी सांगितले.

0 Comments