येत्या काही दिवसात आता नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळांचे प्रवेश चालू होतील. गेल्या दशकापासून इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल वाढत चालेल दिसतोय. यामध्ये आपला समाजातील कथित स्टेस्टस, शेजाऱ्यांनी अथवा नातेवाईकांनी त्यांची मुले इंग्रजी माध्यमात घातली म्हणून आपलं पण घालण्याची मानसिकता, खाजगी शाळांच्या आकर्षक इमारती आणि कॅम्पस अशी नानाविध कारणे आहेत.
तिसरी- चौथी नंतर मात्र खाजगी शाळांची विविध गुणे दिसू लागल्यानंतर पालकांची अवस्था ना घर का ना घाट का अशी होते, हे कोणीही नाकबूल करणार नाही.
मुलांचे कपडे, सॉक्स, बूट्स, पुस्तके, वह्या, वर्षभर चालू असणारे प्रोजेक्ट्स यामधील स्पष्ट जाणवत असलेली कटप्रॅक्टिस इत्यादी गोष्टींची पूर्तता करताना पालकांची दमछाक होते. मग नाईलाजाने दहावी अथवा बारावीपर्यंत आहे त्या स्थितीत इतरांमागून पाय ओढत जावे लागेल.
खरं पाहता आपल्या मुलांना शाळेत घालताना पालकांनी काही तरी सर्वे करायला हवा आणि त्यानंतरच आपल्या मुलांना योग्य त्या माध्यमातून (शक्यतो मातृभाषेतून) योग्य त्या शाळेत प्रवेश घेतला पाहिजे.
सातारा जिल्हा पालक संघाने अशा पालकांसाठी एक प्रश्नावली बनवली आहे. ज्यायोगे पालकांना सुरवातीलाच आपल्या पाल्यासाठी शाळा निवडताना खबरदारी घेता येईल; जेणेकरून मुलांना चांगले शिक्षण तर मिळेलच पण आपली शाळा निवड योग्य असल्याचे मानसिक समाधान सुद्धा कायमचे मिळेल.
A - शाळेत शिकवत असलेल्या शिक्षकांच्या पात्रतेबद्दल तुम्हीं ज्या शाळेत स्वतःच्या मुलाला प्रवेश घेऊ इच्छिता त्या शाळेचा शैक्षणिक दर्जा काय आहे ? उदा.
01 सदरच्या शाळेतील शिक्षकांचे क्वालिफिकेशन काय आहे ?
02 किती शिक्षक हे टीईटी पास आहेत (पात्र नव्हे). शिक्षक होण्यास बीएड, डीएड, एमएड या पदव्या गरजेच्या असतात (बीए, बीकॉम नव्हे).
03 त्यांना पगार किती मिळतो (कारण जर हाय क्वालिफाइड शिक्षक असतील तर पगार पण तसा हवा आणि तुटपुंजा पगार असेल तर शिक्षक किती आत्मियतेनं शिकवेल ?).
हे प्रश्न तुम्हीं प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शाळा प्रशासनाला विचारायला हवेत आणि शाळा प्रशासनाकडून मोघम किंवा थातुरमातुर उत्तरे घेऊ नयेत.
ब - शाळेचा शैक्षणिक दर्जा :-
01 शाळेत किती स्कॉलर मुले आहेत ?
ज्या शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला आहे तेथील स्कॉलर मुलांची संख्या नक्कीच लक्षवेधी असली पाहिजेत. यामध्ये स्कॉलरशिपला पात्र असलेली मुले न पकडता ज्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे तीच ग्राह्य धरावीत.
02 सदरच्या शाळेतून किती मुले सैनिक स्कुल, नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरली ? (या शाळांमध्ये मुलांना प्रवेश परीक्षा सक्तीची असते)
03 सदरच्या शाळेतून किती मुलांनी विज्ञान शाखेत प्रवेश मिळविला. विज्ञान शाखेत मेरीटवरती प्रवेश असल्याने शाळेचा शैक्षणिक दर्जा लक्षात येतो.
क - अभ्यासक्रम :-
शाळेतील अभ्यासक्रमासाठी कोणते पब्लिकेशन वापरले जाते. संपूर्णतः भारत देशात NCERT पब्लिकेशनला प्राधान्य दिले जाते. इतकेच काय तर NCERT चे पब्लिकेशन 'सीबीएसई'ला बंधनकारक आहे. परंतु खाजगी शाळा स्वतःच्या नफ्यासाठी स्वतःचे किंवा खाजगी कंपनीच्या पब्लिकेशनला प्राधान्य देऊन पालकांना विशिष्ठ कंपनीची पुस्तके घेण्यास सांगतात.
वास्तविक NCERT च्या पब्लिकेशनची पुस्तके सैनिक स्कुल, केंद्रीय शाळा, जवाहर नवोदय विद्यालय या संस्था वापरतात आणि या पुस्तकांचे दर पण माफक असताना. असे वेगळे काय इतर खाजगी कंपन्यांच्या पब्लिकेशन मध्ये असते यावर कोणतीही शाळा समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाही.
ड - बोर्ड कोणता हवा ?
स्टेट बोर्ड का सेंट्रल बोर्ड ?
The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) आणि Central Board Of Secondary Education या दोन शैक्षणिक बोर्डस ना आपल्याकडे प्राधान्य असते.
यापैकी स्टेट बोर्ड पेक्षा आजकाल फारशी माहिती न घेता बरेचसे पालक चांगले शिक्षण मिळेल या आशेपायी CBSE संलग्न बोर्डला प्रवेश मिळविताना दिसतात.
खरंतर CBSE अभ्यासक्रम लागू होतो माध्यमिकला, म्हणजेच आठवी नंतर परंतु पालक अगदी नर्सरी पासून मुलांना CBSE शाळेत घालतात. ज्याचा प्रॅक्टिकली मुलांना फारसा उपयोग होत नाही.
उदाहरणादाखल सैनिक स्कुलला प्रवेश मिळवलेली बहुसंख्य मुले ही स्टेट बोर्डाची आणि मातृभाषेत शिकलेली असतात.
CBSE च्या नावाखाली खाजगी शाळा पालकांकडून अवास्तव फी घेत असतात आणि त्याला कोणी वाली नसतो हे पण एक विदारक सत्य आहे.
इ - माध्यम कोणते हवे ?
हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न पालकांनी ध्यानात घ्यायला हवा.
मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हे समजावयास सोपे, सुलभ आणि अपेक्षित परिणामकारक असते.
मातृभाषेतून शिकल्याने इतर भाषांवर प्रभुत्व मिळणे सोपे जाते.
इतर माध्यम निवडल्यास मुलांचा भाषेचा पायाच डळमळीत होतो. इतर माध्यमातून शिकताना मुले आधी सदरची भाषा मनात मातृभाषेत ट्रान्सलेट करतात आणि नंतर परत सदरच्या भाषेत उत्तरतात याने मुलांना दुप्पट मानसिक मेहनत करावी लागते.
मातृभाषा हीच शिक्षणासाठी हवी असे बहुसंख्य शिक्षणतज्ज्ञ आणि विद्वान सांगतात.
फ - स्पोर्ट्स आणि भारतीय संस्कृती
01 शाळेत भारतीय परंपरेचे कोणकोणते सण साजरे होतात ? यामध्ये मुलांना किती सामावून घेतले जाते.
02 शाळेत वैयक्तिक आणि सांघिक खेळांना किती प्राधान्य देते ?
03 शाळेतून किती विदयार्थी राज्यपातळीवर, देशपातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले आहेत आणि यामध्ये शाळेचे योगदान काय ?
पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत घालण्याआधी वरील प्रश्नांची उत्तरे शाळेला मागवीत, स्वतःला विचारावीत, नंतर निर्णय घ्यावा.
काही शंका असल्यास आमच्या खालील टीम मेंबर्संना संपर्क साधावा.
सातारा जिल्हा पालक संघ
सातारा
नितीन उल्मेक - 8149278749
प्रशांत मोदी - 9145500012
पंकज नागोरी- 9422030708

0 Comments