एनआयए-झारखंड पोलिसांची नेपाळमध्ये संयुक्त कारवाई
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
रांची: माओवादी संघटना पीएलएफआयचे प्रमुख दिनेश गोप याला अटक करण्यात आली आहे. त्याला नेपाळमध्ये अटक करण्यात आली. एनआयए व झारखंड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हे यश मिळाले. झारखंड पोलिसांनी दिनेश गोपवर 25 लाखांचे बक्षीस ठेवले होते. तसेच राष्ट्रीय तपास संस्थेनेही (एनआयए) त्याच्यावर 5 लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते. आता त्याला नेपाळमधून दिल्लीत आणण्यात आले. त्यानंतर सायंकाळी उशिरा त्याला दिल्लीहून रांचीला हलवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
नेपाळमध्ये शीख वेशात राहत होता
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीच्या एनआयए स्पेशल टीम व झारखंड पोलिसांनी संयुक्तपणे शनिवारी सायंकाळी दिनेश गोपला अटक केली. दिनेश नेपाळमध्ये शीखांच्या वेशात राहत होता. त्यांच्यावर 2 डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. यात कंत्राटदार व व्यावसायिकांना धमकावून खंडणी वसूल करणे व साथीदारांमार्फत खंडणीची रक्कम गुंतवण्यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
दिनेश गोपच्या 2 बायकांनाही अटक
30 जानेवारी 2022 रोजी, एनआयएने टेरर फंडिंग प्रकरणाचा तपास करत दिनेश गोपच्या हीरा देवी व शकुंतला कुमारी या 2 बायकांना अटक केली होती. या दोघींवर शेल कंपन्यांमध्ये लेव्ही-एक्सटॉर्शनचे पैसे गुंतवल्याचा आरोप होता. चौकशीत त्याची पुष्टीही झाली आहे. यापूर्वी 10 नोव्हेंबर 2016 पोलिसांनी रांचीतून दिनेश गोपची 25 लाख 38 हजार रुपयांची रक्कम जप्त केली होती.
झारखंड पोलिसांशिवाय एनआयएनेही दिनेश गोपच्या सहकार्यांकडून 42.79 लाख रुपयांच्या रोकडीसह 70 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. एनआयएच्या तपासात आतापर्यंत 2 डझनहून अधिक बँकांमध्ये दिनेश गोपने आपल्या पत्नी व कुटुंबीयांच्या माध्यमातून अडीच कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा खुलासा झाला आहे.

0 Comments