Hot Posts

6/recent/ticker-posts

जबरी चोरीतील दरोडेखोरांच्या टोळीला अटक!

सातारा स्थानिक गुन्हे शाखेसह पुणे ग्रामीण ची कारवाई; संशयितांना 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी
सातारा : सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे कुरियर सातारा येथून पुण्याकडे घेऊन निघालेल्यांना काशिळ गावच्या हद्दीत अडवून त्यांच्या तोंडावर स्प्रे मारून लुटणार्‍या कोल्हापूर येथील दरोडेखोरांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांसह सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणि यवत पोलिसांनी सापळा रचुन अटक केली आहे. या संशयितांना सातारा न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केलेल्या या 7 जणांच्या टोळीकडून तब्बल 24 लाख 72 हजार 820 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
 सरफराज सलीम नदाफ (वय 34), मारूती लक्ष्मण मिसाळ (वय 31, दोघे रा. कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सुरज बाजीराव कांबळे (वय 24), करण सायजी कांबळे (वय 23, दोघे रा. सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), गौरव सुनिल घाडगे (वय 23, रा. मिनचे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), समीर धोंडिबा मुलाणी (वय 29) आणि रियाज दस्तगीर मुजावर (वय 33, दोघेही रा. कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पार्सल घेवुन सातार्‍याहून पुण्याकडे निघाले होते. सातारा तालुक्यातील मौजे काशिळ गावाच्या हद्दीतील ब्रिजवर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या इतरांच्या तोंडावर कोणता तरी स्प्रे मारून त्यांच्या ताब्यातील दागिने लुटले होते. आरोपी हे यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पुणे-सोलापूर हायवे रोडने इनोव्हा गाडीतून जात असल्याबाबतची माहिती वरिष्ठांनी पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे यांना दिली होती. पीआय हेमंत शेंडगे यांनी तात्काळ पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल लोखंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाबळे आणि इतर पोलिसांचे पथक तयार करून कासुर्डी टोलनाका येथे नाकेबंदीसाठी पाठविले. नाकाबंदी दरम्यान कासुर्डी टोलनाक्यावर आरोपींना पाठलाग करून पकडण्यात आले.
 पोलिसांनी चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी 18 किलो 500 ग्रॅम वजनाचे चांदी आणि 79.45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्हयात वापरलेली इनोव्हा गाडी, छर्‍याचे पिस्टल, चाकु, मोबाईल आणि इतर ऐवज असा एकुण 24 लाख 72 हजार 820 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. अटक आरोपींना सातारा पोलिस दलातील बोरगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, संशयितांना सातारा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पुणे ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, वाबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, आतिश घाडगे, संजय शेळके, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, अमोल माने, राकेश खांडके, मोहन नाचन, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, शिवाजी भिसे, विक्रम पिसाळ, स्वप्निल माने, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, रोहित निकम, स्वप्नील दौंड, संकेत निकम, शिवाजी गुरव यांनी केली आहे. या कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments