शिक्षण संस्थेकडे मागितले 2 लाख
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: एका शिक्षण संस्थेकडे 2 लाख रुपयांची मागणी करून 1 लाखांची लाच घेणार्या वकिलास सातारा जिल्हा न्यायालयात लाचलुचपत खात्याने रंगेहाथ पकडले. विलास बाळकृष्ण कुलकर्णी (रा. सातारा) असे या लाचखोर वकिलाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेचा दावा जिल्हा कोर्टात सुरु आहे. दिवाणी न्यायालयातील निकाल संस्थेच्या बाजूने लावण्याकरिता लोकसेवकावर प्रबाव पाडून कुलकर्णी याने 2 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित संस्थेच्या अध्यक्षाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत खात्याने सापळा रचला. सोमवारी दुपारी 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
या कारवाईमुळे न्यायक्षेत्र तसेच शैक्षणिक क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस उपअधीक्षक श्रीमती उज्ज्वल वैद्य, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश येवले, तुषार भोसले, शितल सपकाळ या कर्मचार्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. कुलकर्णी विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

0 Comments